राज्यात 20 पर्यंत पावसाची शक्यता
पणजी : गोव्यात येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत अनेक भागात जोरदार तथा मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवसांकरिता जारी केला आहे. यंदा ऐन दिवाळीत पावसाची शक्यता यापूर्वी व्यक्त केली होती, त्यानुसार आता जोरदार पाऊस गोव्यातील अनेक भागात पडण्यास प्रारंभ झाला आहे. रात्री उशिरा गोव्याच्या काही भागात जोरदार वारे सुरू झाले, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. गोव्यातील दिवाळीचे वैशिष्ट्या म्हणजे नरकासुर प्रतिमा जोरदार वादळी वाऱ्याबरोबरच पावसामुळे अनेक ठिकाणी भिजून गेल्या.
त्यामुळे कित्येक दिवस रात्रीचे जागरण करून उभारण्यात आलेल्या नरकासुर प्रतिमांवर पावसाचे पाणी पडले आणि उत्साहावर देखील पाणी पडले. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोव्याच्या दिशेने जोरदार वादळी वारे वाहू लागले. त्याचबरोबर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. दरम्यान मान्सूनने गोव्याबरोबरच संपूर्ण देशातून माघार घेतली आणि त्याचबरोबर ईशान्य मान्सूनला प्रारंभ झाला. यादरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकाचा काही भाग आणि केरळमध्ये देखील जोरदार पाऊस झाला. आगामी 24 तासात या राज्यांबरोबरच ओडिशा, झारखंड, बंगाल इत्यादी भागात देखील पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.