शनिवारपर्यंत दररोज पावसाची शक्यता
अरबी समुद्रात व बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा
पणजी : गोव्यात सोमवारी रात्री उशिरा पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. मंगळवारी दुपारनंतर गडगडाटासह अनेक ठिकाणी जोरदार वृष्टी झाली. दि. 25 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान, दररोज गोव्यातील विविध भागात मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. मान्सूनने देशभरातून माघार घेतल्यानंतर दररोज दुपारनंतर मेघगर्जना होते. त्यानंतर जोरदार पाऊस पडणे सुरु आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाडीत एकाचवेळी दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यांचे वादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे सध्या दुपारच्यानंतर गोव्यात गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचे सत्र सुरु आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडून गेला.
सोमवारी रात्री उशिरा सांखळीत मुसळधार पावसाबरोबरच विजांचा गडगडाट झाला. तासभरात पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर त्या परिसरात वीजाही कोसळल्या. तथापि, कोणतीही हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. सोमवारी रात्री पणजीसह गोव्याच्या विविध भागाला पावसाने झोडपले. पेडणे व काणकोण येथे प्रत्येकी 1 इंच पाऊस पडला. पणजी येथे एक इंचाच्या जवळ एवढा पाऊस पडला. केपेमध्ये पाउण इंच, मुरगावातही पाउण इंच पाऊस पडला. म्हापसा, दाबोळी, धारबांदोडा व फोंडा येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. फोंडा व सांगे येथे तुरळक पाऊस पडला. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी पाउण इंच पाऊस पडला. यंदा मान्सूनोत्तर पाऊस आतापर्यंत 3.5 इंच एवढा झालेला आहे. आजही दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.