ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
पणजी : हवामान खात्याने जी माहिती उघड केली आहे, त्यानुसार अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात पुढील 18 तासात रूपांतर होऊ शकते आणि त्यानंतर पुढील दोन दिवसात ते केरळ, कर्नाटकच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. तिथून ते उत्तरेच्या दिशेने म्हणजेच गोव्याच्या दिशेने वर येण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे यंदा ऐन दिवाळीत जोरदार पाऊस गोव्यातही पडणार आहे. गोव्याच्या दिवाळीमध्ये प्रत्येक गावामध्ये नरकासुराच्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. सध्याच्या स्थितीमध्ये गोव्यात सर्वत्र पाऊस दाटून आलेला आहे, परंतु अवघ्या दोन-तीन ठिकाणी गुऊवारी रात्री पाऊस पडला.
पणजीतही वळीवाच्या पावसाप्रमाणे किंचित पाऊस, त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहून गेले. अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळी मेघगर्जना होत आहेत. लक्षद्वीपपासून उत्तरेच्या दिशेने तथा पश्चिमेच्या दिशेने पावसाळी ढग एकत्रित आले आणि कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झालेले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार त्याचे आज वा उद्या वादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे पुढील 48 तासात कर्नाटक तसेच गोव्यातही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच जे अनुमान वर्तवले होते, त्यानुसार 23 ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान काही भागात जोरात तर काही भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडेल. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग वाढत राहील, असे म्हटले आहे.