हरियाणात नेतृत्वबदल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याची चर्चा ः भाजप नेतृत्व घेणार निर्णय
वृत्तसंस्था / चंदीगड
हरियाणात सध्या नेतृत्वबदलाची चर्चा जोर धरू लागली आह. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर याचे संकेत मिळाले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी खट्टर यांना ‘ स्थितीबद्दल तुम्ही समाधानी आहात का’ अशी विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पंतप्रधानांच्या या प्रश्नाचे अनेक अर्थ काढले जात आहेत, याचमुळे नेतृत्व बदलाची चर्चा जोरात सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्यामागील कारण अलिकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची खराब कामगिरीही असल्याचे मानले जात आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 6 महिन्यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा सिथतीत हरियाणात देखील अन्य राज्यांप्रमाणे चेहरा बदलण्याचा निर्णय भाजप घेऊ शकतो. हरियाणात भाजप सरकारचा हा दुसरा कार्यकाळ आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांनी मोठी संधी दिल्याबद्दल सदैव आभारी राहणार असल्याचे नमूद पेल आहे. खट्टर हे जुने सहकारी असल्यानेच मोदींनी त्यांना अप्रत्यक्षपणे नेतृत्वबदलाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
संघाचे प्रचारक राहिलेले मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मागील महिन्यात संघाच्या अनेक पदाधिकाऱयांना चहापानासाठी निवासस्थानी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान एका संघ प्रचारकाने खट्टर हे मुख्यमंत्रिपदाचा 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे आणि हरियाणाचे तीन दिग्गज नेते चौधरी भजनलाल, चौधरी बंसीलाल आणि चौधरी देवीलाल यांचा विक्रम मोडणार असल्याचे म्हटले होते. यावर मुख्यमंत्री खट्टर यांनी आपले असे कुठलेच लक्ष्य नसल्याचे उत्तर देल होते.
भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही
हरियाणा भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. भाजपला पक्षचिन्हावर केवळ 22 जागांवर विजय मिळाला आहे. राज्यातील मंत्र्यांची खराब कामगिरीही नेतृत्वबदलासाठी कारणीभूत ठरणार आहे. या मंत्र्यांमुळे पूर्ण सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. यावरून मुख्यमंत्री खट्टर यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘म्हारा सीएम, म्हारा हरियाणा’ मोहीम रोखली
हरियाणा भाजपकडून ‘म्हारा सीएम, म्हारा हरियाणा’ मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेशी निगडित पोस्टर्सवर मनोहरलाल खट्टर यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. परंतु केंद्रीय नेतृत्वाकडून मिळालेल्या संकेतांनंर ही मोहीम रोखण्यात आली आहे.
स्वच्छ प्रतिमा हेच बलस्थान
हरियाणात मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून 7 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे, अद्याप ते कुठल्याच मोठय़ा विवादात अडकलेले नाहीत. हीच गोष्ट त्यांच्या बाजूने जाणारी आहे. अशा स्थितीत नेतृत्व बदल करण्याची जोखीम भाजपकडून घेतला न जाण्याचीही शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.