आज मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : यंदाचा पावसाळी मौसम संपुष्टात येण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असताना पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या 24 तासांत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडलेला आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी यंदाचा पावसाळी मौसम संपुष्टात येत आहे, मात्र गुऊवारपासून पावसाने थोडा जोर धरला. शुक्रवारी राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पणजीतही जोरदार वृष्टी झाली. गेल्या 24 तासांमध्ये फोंड्यात अर्धा इंच, दाबोळी, मुरगाव, पेडणे येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. धारबांदोडा येथे एक सेंटीमीटर तर पणजी, सांगे, म्हापसा व काणकोण येथे अर्धा सेंटीमीटर प्रत्येकी पावसाची नोंद झाली. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढलेला आहे.
रात्री उशिरापर्यंत गोव्यातील विविध भागात जोरदार पाऊस चालू होता. आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ओडिशा तसेच मराठवाडा व इतर काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा परिणाम म्हणून गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज एक दिवस ऑरेंज अलर्ट असून उद्यापासून पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. आतापर्यंत गोव्यात 121 इंच पावसाची नोंद झालेली आहे. सरासरीच्या तुलनेत दोन टक्के पाऊस यावर्षी जादा आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे 20 इंचाने कमी आहे. यंदा 16 मेपासून गोव्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि एक जूनपर्यंत सुमारे 28 इंच पावसाची नोंद झालेली आहे.