‘आयसीसी’ बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफी
वेळापत्रकावर एकमत नाही पाकिस्तानची ताठर भूमिका कायम, आज पुन्हा बैठक
वृत्तसंस्था/दुबई-कराची
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठक बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर एकमत होऊ शकले नाही आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचे ‘हायब्रीड’ मॉडेल नाकारल्याने आज शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे.
सरकारच्या मंजुरीअभावी भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास ठाम नकार दिला असूनही ‘हायब्रीड’ मॉडेल स्वीकारार्ह होणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केल्यानंतर ही बैठक लगेच आटोपली. ‘मंडळाची आज अल्पकाळ बैठक झाली. सर्व घटकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पेचावर सकारात्मक उपाय यावा यासाठी काम करणे सुरू ठेवले आहे आणि मंडळ शनिवारी पुन्हा बैठक घेईल तसेच पुढील काही दिवसांत बैठका घेणे चालू ठेवेल अशी अपेक्षा आहे, असे मंडळाचा एक भाग असलेल्या ‘आयसीसी’च्या पूर्ण सदस्य राष्ट्राच्या एका वरिष्ठ प्रशासकाने सांगितले.
पाकिस्तानच्या भूमिकेला पुढे रेटण्यासाठी नक्वी गुऊवारपासून दुबईत असल्याने त्यांनी प्रत्यक्ष बैठकीला हजेरी लावली. बीसीसीआयचे सचिव जय शाह ऑनलाइन पद्धतीने त्यात सहभागी झाले. शाह 1 डिसेंबर रोजी आयसीसीचा पदभार स्वीकारणार आहेत.