चंपाई सोरेन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सरायकेलामधून भाजपच्या तिकीटावर लढणार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सरायकेलामधून भाजप उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. चंपाई सोरेन यांची लढत झारखंड मुक्ती मोर्चाच्या गणेश महाली यांच्याशी होणार आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी झारखंडमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात भाजपची लाट असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपची ही लाट कोणीही रोखू शकणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.
भाजपने सरायकेलामधून माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी चंपाई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अलिकडेच झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सरायकेलामधून गणेश महाली यांना आणि खुंटीमधून रामसूर्या मुंडा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन सध्या गांदेय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे.