पश्चिम भागातील रस्त्यांसाठी आज ‘चलो रास्ता रोको आंदोलन’
म. ए. समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला गावागावांतून उत्स्फूर्त पाठिंबा
वार्ताहर/किणये
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पश्चिम भागातील उचगाव, बाची, तुरमुरी या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सोमवार दि. 11 रोजी भव्य रास्ता रोको करण्यात येणार आहे. या रास्ता रोको आंदोलनासंदर्भात गावागावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या भागातील ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार दि. 11 रोजी तालुक्याच्या पश्चिम भागात एकच नारा ‘चलो रास्ता रोको आंदोलन’ असा राहणार आहे. नुकतीच बेळगुंदी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी व म. ए. समिती युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन या रास्ता रोको आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजू किणयेकर हे होते. यावेळी रामा अमरोळकर, मेघराज सुतार, किशोर मोटणकर, गणेश सुतार, गोविंद बागिलगेकर, कपिल पाटील, शट्टूपा अमरोळकर, दीपक पाटील, बबन निलजकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देऊन तसेच यापूर्वीही आंदोलने करूनही त्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेले आहेत.
या मुख्य रस्त्यावर रोज वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता या भागातील अनेक गावातील वाहनधारकांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. तरीदेखील या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे या भागातील नागरिक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की खड्ड्यांजवळ एक वाहन जात असेल तर दुसरे वाहन जाणे मुश्किल बनले आहे. अनेक अपघातांच्या घटनासुद्धा या रस्त्यांवर घडलेल्या आहेत. हा महत्त्वाचा रस्ता असूनही हा रस्ता दुर्लक्षित का झाला आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अखेर या रस्त्यासाठी आता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला असून दि. 11 रोजी या रस्त्यावर उचगावजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या रास्ता रोको आंदोलना संदर्भात मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, अॅङ एम. जी. पाटील व समितीच्या सर्व नेतेमंडळींनी या भागातील ग्रामपंचायतींच्या अध्यक्षांना निवेदने देण्यात आली आहेत. तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनही या रास्ता रोको आंदोलनात सहभाग दर्शविण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सदर रास्ता रोको आंदोलनासंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक रस्ते खड्डेमय आहेत. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील उचगाव- तुरमुरी-बाची हा रस्ता तर खराब झालेलाच आहे. याचबरोबर कर्ले ते बेळवट्टी, कर्ले ते कावळेवाडी बिजगर्णी, बोकनूर ते सावगाव आदी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहतूक धोकादायक बनलेली आहे. त्यामुळे भागातील काही रस्त्यांचे डांबरीकरण व काही रस्त्यांची दुऊस्ती करणे गरजेचे आहे. या सर्व रस्त्यांसाठी सोमवारच्या रास्ता रोको आंदोलनाला गावागावांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
गावागावांमध्ये जनजागृती
रविवारी दिवसभर या मोर्चासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये फिरून पुन्हा जनजागृती केली आहे. त्यामुळे सोमवारचा हा रास्ता रोको भव्य प्रमाणात होणार आहे.