महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभा निवडणुकीचे अपयश पुसण्याचे भाजपसमोर आव्हान !

06:14 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 प्लसचा नारा दिलेल्या भाजपयुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर, पुण्यात रविवारी झालेल्या भाजपच्या चिंतन शिबिरात भाजप महायुतीने विधानसभेला 200 पारचा नारा दिला आहे. भाजप सोबत महायुतीत असलेल्या शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा जास्त आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅकफुटवर असलेली शिंदेंची शिवसेना एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर आता फ्रन्टफुटवर आली आहे तर तिकडे शरद पवारांवर पुन्हा एकदा अमित शहा यांनी टीका केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गोची झाली आहे. शरद पवारांवर जेव्हा कोणी मोठा नेता टीका करतो तेव्हा शरद पवार दुसऱ्या दिवशी त्या टीकेला जशास तसे उत्तर आपल्या कृतीतृन देतात. त्यांनी  मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे उत्तर दिल्याचे नाकारता येत नाही.

Advertisement

 

Advertisement

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती 200 पार करेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी रविवारी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात बोलून दाखविला. या शिबिराचा समारोप करताना भाजपचे वरीष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सुत्रधार असल्याचे शहा म्हणाले. मात्र शरद पवारांनी त्वरीत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जवळपास तासभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच मराठा-ओबीसी आरक्षणावर चर्चा केल्याचे समजते. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मात्र यांनी पवारांवर केलेल्या आरोपानंतर एकीकडे भाजपची तर दुसरीकडे अजित पवारांची देखील गोची होत असल्याचे वेळोवेळी पहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार हे भटकती आत्मा असल्याचे म्हटले आणि बारामतीच्या लोकांना हे आवडले नाही. त्यामुळे बारामतीतून लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार असलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक बॅनरवऊन मोदींचा फोटो गायब झाला होता. त्यामुळे पवारांवरील टीकेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा अजित पवार गटाचीच अधिक गोची होते, टीकेचे समर्थन तरी कसे करावे आणि विरेध करावा तर आपण भाजपसोबत महायुतीत आहोत. त्यामुळे लोकसभेला ज्यांच्यासाठी मते मागितली त्यांच्याच विरोधात महापालिकेला कसे लढायचे हा खरा प्रश्न असल्याने आगामी काळात अजित पवारांचा राष्ट्रवादी महायुतीत असेल का? हा मोठा प्रश्न आहे.

भाजपने दुसरीकडे 200 हून अधिक जागा स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेली धुसफुस संपता संपत नाही. साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर विरूध्द माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. दोन दिवसापूर्वी रामराजे निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका करताना त्यांची लायकी मोदीपेक्षा जास्त असल्याचे वक्तव्य केले. नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि सुहास कांदे असो ज्या कांदे यांनी पंकज भुजबळला पाडले, तेच कांदे विधानसभेत सातत्याने भुजबळांवर आरोप करतात. त्या कांदे यांच्याशी भुजबळ जमवून घेणार का? एकवेळ शिंदे गटातील नेते हे एकनाथ शिंदे यांचे ऐकतील मात्र राष्ट्रवादीतील जे नेते अजित पवारांसोबत गेलेत ते अजित पवारांचे ऐकणार नाहीत. कारण हे सगळे नेते प्रस्थापित आहेत गेल्या 25 ते 30 वर्षापासून सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडे शरद पवार गटाचा पर्याय आहे. 2019 ला शिवसेना आणि भाजपची युती होती, शिंदेंसोबत आलेले अनेक आमदार हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून आल्याने शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता कमी आहे, अपवाद उरण, रामटेक विधानसभा मतदार संघाचा असू शकतो. भाजपसोबत जे प. महाराष्ट्रातील तरूण नेतृत्व आले ते स्थानिक काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेत्यांच्या मनमानी राजकारणाला कंटाळून, मग ते राहुल कुल असो जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर, संजय काका पाटील, महेश लांडगे अशा अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी संघर्ष करत स्वत:ला सिध्द केले. लोकसभा निवडणुकीचे गणित वेगळे असल्याने त्यात हे विरोधक एकत्र आले, मात्र आता विधानसभेला जागावाटपाचे त्रांगडे सुटता सुटणार नसल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच एकीकडे भाजपची मराठा आरक्षण विरोधी असल्याची जी लोकांमध्ये प्रतिमा आहे, ती पुसण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे. भाजपच्या रविवारच्या अधिवेशनात राज्याचे माजी शिक्षण मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजुच्या खुर्चीवर बसणे असो, विनोद तावडे यांनी आषाढीला पंढरपूरची वारी करणे असो किंवा मुंबईच्या भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची माहिती तावडे यांनी स्वत:च्या सोशल मीडीया अकाऊंटवर टाकत ती काही काळात fिडलीट करणे असो, याचाच अर्थ भाजप विधानसभा निवडणुकीसाठी वेगळ्या नेतृत्वाची चाचपणी करत असल्याचे नाकारता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांच्या हक्काची मते मिळाली नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित राखला तर उध्दव ठाकरे यांनी मुंबईचा आपला गड राखताना मराठवाड्यातील जागा जिंकल्या. मात्र कोकणातील हक्काचा गड ढासळला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील प. महाराष्ट्रातील आपले मतदारसंघ कायम राखताना विदर्भातील वर्ध्याची जागा भाजपकडून खेचून घेतली मात्र मोठे नुकसान झाले ते भाजपचे विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही बालेकिल्ले भाजपने गमावले. लोकसभेला शिंदे गट आणि राष्ट्रवादीला सोबत न घेता जरी भाजप स्वतंत्र लढली असती भाजपला दोन अंकी आकडा पार करता आला असता, भाजपला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत गेल्याने मोठा फटका बसल्याचे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता भाजपनेच मुख्यमंत्री केलेल्या एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अनेक लाडक्या योजनेच्या माध्यमातून वाढत आहे, याचा थेट फायदा भाजपला होईलच का? हे सांगणे कठीण असले तरी भाजपसमोर लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा शिक्का पुसुन आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article