For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राचे आव्हान

06:31 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राचे आव्हान
Advertisement

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा येत्या सोमवारी पार पडत आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक आदी 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यातील काही मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्यत्र भाजपा व शिंदे गटाचा चांगलाच कस लागला आहे. महाविकास आघाडीने महायुतीपुढे उभे केलेले आव्हान पाहता मुंबईसह एकूणच महाराष्ट्रातील निकालाबाबत उत्सुकता असेल. आधीच्या चार टप्प्यांमध्ये मतांच्या टक्केवारीत काहीशी घटच दिसून आली. त्यामुळे पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या 13 जागांवर किती मतदान होते, मुंबईकरांशिवाय इतर भागांतील जनता मतदानासाठी बाहेर पडते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई आणि शिवसेना हे समीकरण मानले जाते. 1966 साली स्थापन झालेल्या सेनेला मागच्या 60 ते 65 वर्षांत अनेक संकटांशी सामना करावा लागला. मात्र, सेनेचा हा गड अभेद्य राहिला. परंतु, आत्ताचे संकट हे सर्वार्थाने वेगळे असून, मुंबईत प्रामुख्याने ठाकरे सेना विऊद्ध शिंदे सेना अशाच लढती होत आहेत. दक्षिण मुंबईत ठाकरे सेनेचे अरविंद सावंत व भायखळ्याच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जाधव यांच्या पतीचे नाव पुढे आले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी तशी वादग्रस्त ठरलेली दिसते. स्वाभाविकच ही जागा ठाकरसेनेसाठी सेफ मानली जाते. उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर विऊद्ध शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर असा सामना आहे. अगदी अखेरच्या टप्प्यात ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकर यांना पक्षात घेण्यात आले व शिंदेसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यात ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे आपण शिंदे गटात आल्याचे वायकर यांनी बोलून सांगितले. त्यामुळे सेनेच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. वायकर मनाने अजूनही उद्धव ठाकरेंजवळच असल्याचेच हे द्योतक ठरावे. याशिवाय खिचडी घोटाळाप्रकरणी कीर्तिकरांवरही आरोप आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कुणाला पसंती मिळणार, याविषयी उत्सुकता असेल. दक्षिण मध्य मुंबईत शिंदेसेनेचे राहुल शेवाळे विऊद्ध ठाकरेसेनेचे अनिल देसाई यांच्यातही चुरशीची लढत असेल. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर शेवाळे यांच्याबद्दल असलेली नाराजी, दहा वर्षांत मतदारसंघात प्रभाव पाडण्यात आलेले अपयश याबाबी त्यांना अडचणीच्या ठरू शकतात. ईशान्य मुंबईत ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील व भाजपाचे मिहिर कोटेचा यांच्यातील लढतही रंगतदार असू शकते. याच मतदारसंघात घाटकोपर परिसर मोडतो. येथील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर याच भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला होता. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे मराठा विऊद्ध गुजरात हा वादही येथे उफाळून आलेला दिसतो. त्यामुळे यात पाटील वा कोटेचा यांच्यापैकी कुणाची सरशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उत्तर मध्य मुंबई व उत्तर मुंबईत काँग्रेस व भाजपा समोरासमोर असतील. तरी तेथे ठाकरे सेनेची भूमिका निर्णायक असेल. उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम व आमदार वर्षा गायकवाड यांच्यातही काट्याची टक्कर होईल. निकम यांच्या मागे भाजपाची मजबूत यंत्रणा व उत्तर भारतीय, जैन, मारवाडी मतपेढी असेल. तर वर्षाताईंमागे दलित, मुस्लिम, ख्रिश्चन मतांशिवाय सेनेचा कट्टर मतदार राहू शकतो. उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला. गोपाळी शेट्टींऐवजी भाजपाने येथून पियूष गोयलना रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसने नवख्या भूषण पाटील यांना तिकीट दिले आहे. येथून क्वचितच काँग्रेसला विजय मिळाला आहे. गोयल यांच्या मांसाहाराबाबतच्या टिप्पणीमुळे मराठी-गुजराती हा मुद्दा येथेही ऐरणीवर आल्याचे दिसून येते. येथील भाजपाची हक्काची व्होटबँक बघता पाटील किती आव्हान देतात, हेच पहायचे. ठाणे व कल्याण लोकसभा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गृहमैदान. त्यामुळे तेथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कल्याणमध्ये तर त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे मैदानात आहे. त्यामुळे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही जागा त्यांना जिंकाव्या लागतील. पालघरमध्ये सेनेच्या भारती कामडी, भाजपाचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा पुन्हा भाजपालाच फायदा होणार का, हेही पहावे लागेल. भिवंडीत महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे यांच्यातील लढतही लक्षवेधक म्हणता येईल. धुळ्यातील निवडणूकही आता पूर्वीसारखी सोपी नाही. भाजपाच्या डॉ. सुभाष भामरे यांना काँग्रेस नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांनी कडवे आव्हान दिल्याचे दिसते. नाशिक व दिंडोरी मतदारसंघात कांद्याचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कांदाप्रश्नाच्या दाहकतेची झळ सहन करावी लागली. मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावरून करण्यात आलेली घोषणाबाजी, त्याला मोदींनी जय श्रीराम, असे दिलेले उत्तर यामुळे वातावरण अधिकच पेटले आहे. कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी नाशिक, दिंडोरीशिवाय इतरही भागात आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघांमध्येही भाजपाला त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दिंडोरीत भाजपाने पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली असली, तरी युतीधर्माचे पालन होताना दिसत नाही. झिरवळ वगैरे मंडळी तुतारी वाजवतानाच पहायला मिळतात. त्यात दादांनीही अलीकडे प्रकृतीचे कारण देत प्रचारातून अंग काढून घेतल्याचे दिसते. खरे तर 2014, 2019 पेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाचा या निवडणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रारंभी महायुती व महाविकास आघाडीला समसमान जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र, आघाडीच्या जागा वाढण्याची चिन्हे आहेत. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चित दूरगामी परिणाम होईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.