ऊस आंदोलन पेटलं; सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सांगली जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
नांद्रे येथे आज स्वाभिमानीचा चक्काजाम
यंदाची पहिली उचल 3500 रूपये जाहीर करावी, गत वर्षीचे 400 रूपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी 10 वाजता सांगली नांद्रे मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. स्वाभिमानीचे नवीनकुमार पाटील चिंचवाडे,सतीश हेरले,यांच्या नेतृत्वाखाली नांद्रेतील सर्वपक्षीय,शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने या आंदोलनात सहभाग घेत चक्काजाम आंदोलन केले.
लक्ष्मी फाटा येथे स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन
गत गळीत हंगामातील उसाला दुसरा हप्ता 400 रुपये आणि चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल 3500 रुपये मिळावे या मागणीसाठी लक्ष्मी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कसबे डिग्रज, दुधगाव, मौजे डिग्रज, कवठेपिरान सह मिरज पश्चिम भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आंदोलन केले. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक दिवस ऊस दर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत ऊसदर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत एकही कारखाना चालू न देण्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी मागील हंगामातील उसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, चालू उसाला 3500 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे, एकच गट्टी राजू शेट्टी, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर स्वाभिमानीचा चक्काजाम
ऊसाला मागील चारशे रुपये आणि चालु वर्षी साडेतीन हजार रुपये दर द्यावा, या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे सामाणी मळ्याजवळ चक्काचाम आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहतूक ठफ्प झाली होती. मिरज ग्रामीण पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करुन चक्काजाम आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.
दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील आरग येथे ऊस वाहतुकीच्या ट्रक्टर अडवून धरण्यात आल्या. तर तत्पूर्वी काही ऊसगाडय़ांचे टायरही पेटविले. ऊस दराचा तिढा सुटत नसल्याने रविवारी जिल्हाभरात चक्काचाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. त्यानुसार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे, तालुकाध्यक्ष सुरेश वसगडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी पंढरपूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. ऊसाला मागील चारशे रुपये व चालू हंगामासाठी साडेतीन हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एकच गट्टी राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे मिरज-पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठफ्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर काही वेळानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.