चैत्रानंद...
चैत्र महिन्यारंभी प्रत्येक दारात चैत्राची रांगोळी सजली. या रांगोळीत विश्वाचा आनंद कण निरनिराळ्या आकारातून प्रकटतो. खऱ्याखुऱ्या आनंदाचे प्रतीक म्हणून या महिन्याकडे मोठेपणाचा मान येतो. आनंदाने निसर्गाच्या गुढ्या ऊभारणारा चैत्र आनंदाची बिजं पेरतो. पण पुढे वर्षभर दु:खाची तणं, गवत, इतकं वाढतं की या बिजाचाच विसर पडतो, म्हणून तर दरवर्षी या सणाचे प्रयोजन.
फाल्गुन संपता संपता उन्हाची काहिली जाणवायला लागते. सकाळी लवकर उठून फिरायला गेल्यावर रस्त्यात सुकलेल्या पानांनी कालहट्टाने रस्त्यात लोळण घेत दंगा मस्ती केली असावी, असे दिसत होते. नारळाच्या झावळ्यासुद्धा पार्लरला जाऊन आल्यासारख्या वाटल्या. केसांची एकच बट तपकीरी करून आल्या होत्या. जवळच्या छोट्या झाडावर फांद्या फिरवून गुदगुल्या करत होत्या. काही वेली मात्र धीटपणे नारळाच्या अंगाखांद्यावर झुलत होत्या. बरीच फुलझाडं वेडीवाकडी वाढल्याने मोगऱ्याला बोगनवेलीची फुलं तर शेवगाच्या झाडाला घोसाळ्याची फळं. निवडुंगावर चाफा आणि कण्हेर तर केळीच्या पानातून कैरीचे झुपके डोलत होते. अवघा रंग एक होतो म्हणजे नेमकं काय ते या क्षणी जाणवत होतं.
इतक्यात वाऱ्याची मोठी झुळूक आली. सगळ्या रस्त्यावरची पानं गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसली. पावसाच्या हलक्या सरी येऊन अंगणात सडा टाकून गेल्या. अग्गोबाई चैत्र गौरीची तयारी करायला हवी असं मनात यायला आणि समोर गुलमोहरचा सडा पडायला एकच वेळ आली. बहाव्याच्या पिवळ्या पाकळ्या आणि गुलमोहरच्या लाल हळदी कुंकू करत होती. घरातल्या म्हातारीसारखी येरझरा घालत खारूताईची अखंड वटवट सुरू होती. कावळे मात्र काय हा यड्याचा बाजार म्हणून लांब सुकलेल्या झाडावर बसले होते. खंड्या आणि वेडे राघू आनंदाच्या भरात एक जागी बसू शकत नव्हते. कबुतरं एखाद्या राजकारण्यांच्या आवेशात आपल्याच भागाचा कार्यक्रम असल्यासारखे मिरवत होते. मी मात्र या शाही सोहळ्यात रंगून गेले होते. अनवाणी पायाने त्या रेड कार्पेटवरून चालत होते. आजुबाजूला उभी असलेली झाडं अदबीने मानवंदना देत होते. रानजाई, मोगरा, चाफा, मधुमालती आणि निरनिराळ्या फळझाडांचे मोहोर हवेमध्ये एअर फ्रेशनर भरत होते. गॅलरीतल्या फुलांनी पण लांबून हात हलवून आनंद व्यक्त केला.
हे सगळं बघायला दोन तीन फणस आईला न विचारताच झाडावरून पळाले होते. नारळाचीही दोन तीन सुकलेली शहाळी हात सोडून उडी मारून खाली आली होती. भारद्वाज मात्र सरकारी नोकराप्रमाणे सगळे ठीक चाललंय ना बघून मस्टरला सही करून निघून गेला होता. अंबा मात्र छोट्या बाळ कैरीच्या माळा गाठीच्या माळेसारख्या बांधून चैत्राचा आनंद साजरा करत होता. पावसाच्या सरींनी प्रत्येक कोपरा स्वच्छ केला. आता त्या बेचक्यामध्ये असलेली तपकीरी पानाची जोडी आनंदाने उभी होती.
या सगळ्या सोहळ्यात बागडायला सज्ज झाली होती. जमिनीवरची कोपऱ्यात पडलेली सुकलेली पानं तृप्त मनाने मातीत विसावायला आतुर झाली होती. जन्माइतका मृत्युही सहज असतो याचं लोभसवाणं आनंददायी चित्र म्हणजे हा चैत्र. विलयाला पायाखाली ठेवून बिजांकुराला एका लयीत जपणारा चैत्र हृदयातून ओसंडून जातो आणि हाताच्या मुठीत मावत नाही, पण आनंद होऊन प्रकटतो हेच खरं.