शहरात आज अडीच हजारांचा पोलीस बंदोबस्त
परजिल्ह्यांतून कुमक : मोबाईल चोरांवरही लक्ष
बेळगाव : राज्योत्सव व काळादिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस यासाठी जुंपण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव शहरात सध्या उपलब्ध असलेल्या बळाबरोबरच बाहेरूनही बंदोबस्तासाठी अधिकारी व पोलीस मागविण्यात आले आहेत. गुरुवारी बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस परेड मैदानावर बोलावून त्यांच्या नेमणुकीबाबत माहिती देण्यात आली. परजिल्ह्यांतून 10 एसीपी, 30 पोलीस निरीक्षक, 73 पोलीस उपनिरीक्षक, 120 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 1300 हवालदार व पोलीस, राज्य राखीव दलाच्या 10 तुकड्या व 300 होमगार्ड मागविण्यात आले आहेत. गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करणारे व मोबाईल चोरणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.