‘व्हीआयपी’ मधील 32 टक्के हिस्सेदारी अध्यक्षांनी विकली
व्हीआयपीचा 53 वर्षांपासून सूटकेस आणि बॅग निर्मितीचा व्यवसाय
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातील सर्वात मोठी कंपनी व्हीआयपी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप पिरामल यांनी कंपनीतील त्यांची 32 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही हिस्सेदारी खासगी इक्विटी फर्म मल्टीपल्स आणि इतर गुंतवणूकदारांना 1,763 कोटी रुपयांना विकली जाणार असल्याची माहिती आहे. पिरामल म्हणाले की, त्यांच्या पुढच्या पिढीला व्यवसाय चालवण्यात रस नव्हता, म्हणूनच हा निर्णय घेतला. व्हीआयपी इंडस्ट्रीज 53 वर्षांपासून सूटकेस आणि बॅग बनवण्याच्या व्यवसायात आहे. व्हीआयपी इंडस्ट्रीज गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व राखत आघाडीवर आहे, परंतु गेल्या 5 वर्षांपासून कंपनीचा बाजारातील वाटा सातत्याने घसरत आहे. कंपनीचे बाजार मूल्य 6,830 कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.
कंपनीचा बाजारातील वाटा
अॅरिस्टोक्रॅट, कार्लटन, स्कायबॅग्ज आणि कॅप्रेस सारख्या ब्रँड्सची मालकी असलेल्या व्हीआयपी इंडस्ट्रीजचा एकेकाळी भारतात 50 टक्के बाजारात वाटा होता. परंतु आता सॅमसनाईट आणि सफारी इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांच्या तुलनेत वाटा 38 टक्क्यांनी कमी झाला आहे.
पुढची पिढी व्यवसाय चालवू इच्छित नाही
53 वर्षांपासून दिलीप पिरामल यांनी भारतातील सर्वात मोठ्या सूटकेस आणि बॅग ब्रँड असलेल्या व्हीआयपी इंडस्ट्रीजचे नेतृत्व केले. पण आता त्यांच्या तीन मुली: राधिका, अपर्णा आणि प्रियदर्शिनी यांना सदरच्या व्यवसायात रस नाही आहे. पिरामल पुढे म्हणाले की, आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे, परंतु पुढची पिढी तो चालवू इच्छित नाही. शिवाय, कंपनी गेल्या पाच वर्षांपासून बाजारातील वाटा गमावत आहे आणि गेल्या वर्षीच्या चारही तिमाहीत तोटा सहन करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. हिस्सेदारी 51.73 वरून 19.73 टक्के पर्यंत कमी झाली आहे. व्हीआयपी इंडस्ट्रीजमधील 32 टक्क्यांनी हिस्सेदारी मल्टीपल्स प्रायव्हेट इक्विटी, आकाश भन्साळी आणि कैर्टलेनचे संस्थापक मिथुन सचेती यांना 1,763 कोटी रुपयांना विकली जात आहे.