मनपा स्थायी समित्यांच्या अध्यक्षांनी सूत्रे स्वीकारली
► प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेच्या चारही स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षांची निवडदेखील बिनविरोध करण्यात आली. सोमवार दि. 15 रोजी या सर्वांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. प्रत्येक कक्षामध्ये पूजाअर्चा करून त्यानंतर या सर्वांकडे पदभार सोपविण्यात आला. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीशैल कांबळे यांची निवड झाली. अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेत्रावती भागवत, सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षपदी जयतीर्थ सवदत्ती, लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रेश्मा कामकर यांची निवड झाली होती. या सर्वांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे ही निवडणूक उशिराने घेण्यात आली. महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी यामध्ये बाजी मारली आहे. 5-2 या फॉर्म्युल्यानुसार ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर अध्यक्ष निवडही बिनविरोध करण्यात आली असून चारही स्थायी समित्यांवर भाजपचेच नगरसेवक विराजमान झाले आहेत.
सोमवारी कक्षावर नामफलकांसह ते कक्ष त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. आता या सर्व स्थायी समित्यांच्या माध्यमातून बैठका घेतल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला विरोधी गटाचे नगरसेवक मात्र गैरहजर होते. याचबरोबर सत्ताधारी गटातील काही नगरसेवक गैरहजर असल्याने या निवडीमध्ये नाराजी असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.