शासनाने आमची फसवणूक केली! नुकसान भरपाईच्या मागणीसाठी रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण
रत्नागिरी प्रतिनिधी
कोकणातील शेतकऱ्यांना अजूनही सरसकट कर्जमाफी आणि अवकाळी पावसाची नुकसानभरपाई दिलेली नाही. संपुर्ण कोकणची अर्थव्यवस्था आंबा आणि काजू या पीकांवर चालते. शासनाने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आता सहन केली जाणार नाही असा इशारा देत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रत्नागिरीतील फळबागायतदारांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.
कोकणातील आंबा आणि काजू हे मुख्य पीक असून त्यावरच कोकणची अर्थव्यवस्था चालते. शासनाने आंबा- काजू बागायतदारांची कर्जमुक्ती करून सातबारा कोरा केला नाही. अल्प अशी रक्कम देउन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे इथून पुढे ती सहन केली जाणार नाही. चालू हिवाळी अधिवेशनात शासनाने कोकणातील शेतकऱ्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. यासाठी 11 डिसेंबरपासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथील बागायतदार शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु केले आहे. असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
गेल्या 2022-23 हंगामात फक्त 12 टक्केच आंबा उत्पादन आले. शासनाकडुन मदत मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती. परंतु आता दुसरा हंगाम आला तरी अजून शासनाने मदत जाहिर केलेली नाही. शासनाने आता प्रत्येक कलमामागे 15 हजार रुपये या प्रमाणे सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाकडुन अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी 11 डिसेंबरपासून हे उपोषण सुरु असल्याचेही उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.