कुणबी नोंद शोधण्याची मोहिम होणार गतिमान; जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षाची होणार स्थापना
कक्षाकडून मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदीची केली जाणार तपासणी; तालुकास्तरावर देखील होणार कक्ष
कोल्हापूर कृष्णात चौगले
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्यस्तरावर समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सर्व जिह्यांचे जिल्हाधिकारी सदस्य आहेत. या समितीने आपला अहवाल 24 डिसेंबर 2023 पर्यंत शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवर कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कक्षाची स्थापना केली जाणार असून येत्या दोन दिवसांत कामकाज सुरु केले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे कक्षाकडे सादर केल्यास ते स्विकारले जाणार आहेत.
कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी अनेक अभिलेख्यांतील कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये महसूली अभिलेख्यांमधील खासरापत्रक, पाहणीपत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नं.01 हक्क नोंदपत्रक, नमुना क्र. 02 हक्क नोंदपत्रक व 7/12 उतारपत्रक, जन्म-मृत्यू रजिस्टर संबंधित अभिलेखे, शैक्षणिक अभिलेखे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख्यांमधील अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख, कारागृह विभागाच्या अभिलेख्यांमधील रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्चा कैद्यांची नोंदवही, पोलीस विभागाच्या अभिलेख्यांमधील गाववारी, गोपनीय रजिस्टर सी-1, सी-2. क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफ आय आर रजिस्टर यांची पडताळणी केली जाणार आहे. सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेखे, खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी ठोकेपत्रक, बटाईपत्रक, दत्तक विधानपत्रक, मृत्युपत्रक, ईच्छापत्रक, तडजोडपत्रक, भूमी अभिलेख विभागाच्या अभिलेख्यांमधील पक्काबुक, शेतवारपत्रक, वसूली बाकी, ऊल्ला प्रतीबुक, रिव्हीजन प्रतीबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील अभिलेख्यांमधील माजी सैनिकांच्या नोंदी,जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील वैध व अवैध प्रकरणांचा तपशील आदी विविध कागदपत्रांचा कुणबी नोंद शोधण्यासाठी आधार घेतला जाणार आहे.
मोडी, कन्नड, उर्दू भाषेतील दस्तऐवजांचे केले जाणार भाषांतर
ज्यांच्या नोंदी आढळतात, अशा व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी सुरू करावी असे शासनाचे निर्देश आहेत. यामध्ये मोडी, उर्दू भाषेतील दस्तावेजाचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजीटाइज व प्रमाणित करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या अभिलेख्यांची होणार पडताळणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षांतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर एक कक्ष स्थापन केला जाणार आहे. तेथे एक नोडल अधिकारी व त्यांच्या मदतीला आवश्यक कर्मचारी दिले जाणार आहेत. या कक्षामार्फत 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून कुणबी जातीची नोंद असलेले अभिलेख शोधले जाणार आहेत.