सिरॅमिक कामगार-रयत संघाचा तहसीलदार, नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा
ठराव रद्द करून उतारे देण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी : आठवड्यात उतारे नोंद करून द्यावेत
खानापूर : येथील सिरॅमिक कामगार संघटना आणि रयत संघ यांच्यावतीने तहसीलदार कार्यालय आणि नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून माउलीनगर सिरॅमिक कामगार वसाहतीचे उतारे पुन्हा दाखल करण्यात यावेत, अन्यथा सात दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी कामगार संघटना रयत संघाच्यावतीने देण्यात आला.खानापूर येथे सिरॅमिक कारखान्याच्या कामगारांना सिरॅमिक कारखान्याच्या मालकांनी कामगारांच्या वसाहतीसाठी स्टेशनरोड येथील 93-ए1 यातील 6 एकर 20 गुंठे जागा देण्यात आली होती. यात 138 भूखंड कामगाराना देण्यात आले होते. त्यानुसार नगरपंचायतीने उतारेही दिले होते. कामगारांनी या वसाहतीवर आपली घरेही उभारली आहेत. तसेच शाहूनगर वसाहत नागरिक संघटना आणि माउली नगर सिरॅमिक कामगार संघटना यांच्यात खानापूर न्यायालयात दावा प्रलंबित आहे. असे असताना नगरपंचायतीने नोंद असलेले उतारे रद्दबातल करण्याचा ठराव करून माउलीनगर वसाहतीतील उतारे रद्दबातल केले आहे.
पूर्वसूचना न देता रद्द
गेल्या 25 वर्षापूर्वीपासून नोंद असलेले उतारे कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता रद्दबातल करण्यात आल्याने माउली नगर वसाहतीतील भूखंड मालक आणि रयत संघटना यांच्यावतीने शुक्रवारी मोर्चा काढून तहसीलदार आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून सात दिवसाच्या आत रद्दबातल केलेले उतारे पुन्हा नोंद करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रेड टू तहसीलदार संगोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण याबाबत वरिष्ठांना माहिती देवू, असे आश्वासन दिले. तसेच नगरपंचायतीचे अभियंते तिरुपती राठोड यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण मुख्याधिकाऱ्यांना यासंबधी माहिती देवू, असे आश्वासन दिले. या मोर्चात माउली वसाहतीचे भूखंडधारक आणि रयत संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.