बेन डकेट, पोप, क्रॉली यांची शतके, इंग्लंडचा 565 धावांचा डोंगर
लंडन : 22 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेचे यजमानांनी चांगलेच स्वागत केले. जॅक क्रॉली, बेन डकेट व ऑली पोप यांनी शतकी खेळी करताना धावांचा डोंगर उभा केला. जो रूटला आज मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. टेंट ब्रिज येथे इंग्लंड आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघात सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव 6 बाद 565 धावांवर घोषित केला. सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून पहिल्याच दिवशी तीन टॉप ऑर्डर फलंदाजांनी शतके झळकावली. 2022 मध्ये इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध असाच एक पराक्रम केला होता. त्यानंतर जॅक क्रॉलीने 124, बेन डकेटने 140 आणि ऑली पोपने 171 धावा केल्या.
जो रुटचा आणखी एक कारनामा
जो रुटने 34 धावांच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 13000 धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, क्रिकेट विश्वात फक्त पाच फलंदाजांना हा पराक्रम करता आला आहे. डावांच्या बाबतीत या सर्वात संथ 13000 धावा ठरल्या. सचिन तेंडुलकरने 266 डावांत, जॅक कॅलिसने 269 डावांत, रिकी पाँटिंगने 275 डावांत, राहुल द्रविडने 277 डावांत व जो रुटने 279 डावांत हा टप्पा ओलांडला.
कसोटीत दुसऱ्यांदा सर्वात वेगवान 500 धावा
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जलद 500 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी 90 षटकांत पाचशे धावांचा टप्पा पूर्ण केला. दरम्यान, सर्वात जलद 500 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही इंग्लंडच्याच नावावर आहे. 2022 मध्ये, रावळपिंडी येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात इंग्लंडने हा कारनामा केला होता.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 6 बाद 565 घोषित (जॅक क्रॉली 124, बेन डकेट 140, ओली पोप 171, जो रुट 34, हॅरी ब्रुक 58, मुजरबानी 3 बळी).