मुशीर खान, लाड यांची शतके
वृत्तसंस्था / मुंबई
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शनिवारपासून सुरू झालेल्या ड इलाईट गटातील सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध यजमान मुंबईने पहिल्या डावात 5 बाद 289 धावा जमविल्या. सलामीच्या मुशीरखान आणि सिद्धेश लाड यांनी शानदार शतके झळकविली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. त्यांचे चार फलंदाज केवळ 73 धावांत तंबूत परतले. त्यानंतर सलामीचा मुशीरखान आणि सिद्धेश लाड यांनी पाचव्या गड्यासाठी 157 धावांची भागिदारी करताना आपली वैयक्तिक शतके झळकविली. दिवसअखेर मुंबईने आपली स्थिती थोडीफार मजबूत केली आहे. मुशीरखानने 162 चेंडूत 14 चौकारांसह 112 धावा झळकविल्या. सिद्धेश लाड 1 षटकार आणि 14 चौकारांसह 100 धावांवर खेळत असून आकाश आनंद 3 चौकारांसह 26 धावांवर खेळत आहे. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 59 धावांची भार घातली आहे. हिमाचलप्रदेशतर्फे गुलेरियाने 2 तर आरोरा, शर्मा व दागर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 88 षटकात 5 बाद 289 (मुशीरखान 112, सिद्धेश लाड खेळत आहे 100, आकाश आनंद खेळत आहे 26, म्हात्रे 9, रहाणे 2, सर्फराज खान 16, गुलेरिया 2-56)