केएल, जुरेल, जडेजाची शतके
भारत 5/448, टीम इंडियाकडे 286 धावांची आघाडी : गिलचाही अर्धशतकी धमाका
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडियाने पकड मिळवली आहे. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 5 बाद 448 धावा करत 286 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा 104 तर वॉशिग्टंन सुंदर 9 धावांवर खेळत होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजसाठी पूर्णपणे चुकला. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा पहिला डाव अवघ्या 44.1 षटकांत 162 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक 32 धावा केल्या, तर शाई होप आणि कर्णधार रोस्टन चेस यांचा संघर्षही अपुरा पडला. वेस्ट इंडिजच्या 162 धावांना प्रत्युत्तर देताना, भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी कॅरिबियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पहायला मिळाले. युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले आणि 125 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला केएल राहुलने संयमी 100 धावा करत चांगली साथ दिली. शुभमन गिल (50 धावा) यानेही अर्धशतकाचे योगदान दिले. याशिवाय जडेजानेही शतकी खेळीचा नजराणा चाहत्यांसमोर पेश केला.
राहुलचे 11 वे कसोटी शतक
टीम इंडियाने 2 बाद 121 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. केएल राहुल आणि शुभमन गिलने एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. या दोघांनी 98 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, गिलने आपले अर्धशतक साजरे केले, पण अर्धशतकानंतर तो रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 5 चौकारासह 50 धावांचे योगदान दिले. त्यानंतर राहुलने आपले 11 वे कसोटी शतक साजरे केले. त्याने आपल्या 197 चेंडूच्या खेळीत 12 चौकार लगावले. 2016 नंतर भारतात केलेले हे त्याचे पहिले शतक आहे.या काळात त्याने 11 अर्धशतके झळकावली होती, मात्र ती शतकांत रूपांतरित करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचे हे फक्त दुसरे शतक आहे.
जुरेल आणि जडेजाचीही शतकी धमाका
केएल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल आणि रविंद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी 206 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. या दोघांनी विंडीज गोलंदाजांना चांगलाच घामटा फोडताना चौफेर फटकेबाजी केली. जुरेलने आपले पहिले कसोटी शतक साजरे करताना 210 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारासह 125 धावांची खेळी साकारली. शतकानंतर तो 125 धावांवर बाद झाला. जडेजानेही आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवताना सहावे कसोटी शतक झळकावले. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 448 धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस जडेजा 176 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 104 तर वॉशिग्टंन सुंदर 9 धावांवर खेळत होते.
ध्रुव जुरेलचे अनोखे सेलिब्रेशन
अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल चमकला. जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जुरेलने आपली बॅट रायफलसारखी खांद्यावर धरली आणि आर्मी कडक सॅल्यूट दिला. त्याचे वडील कारगिल युद्धातील सैनिक असल्यामुळे त्याचा कल लहानपणापासूनच सेनेकडे आहे. त्यामुळे त्याचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय, जुरेल वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक करणारा पाचवा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. त्याच्या आधी विजय मांजरेकर, फारुख इंजिनिअर, अजय रात्रा आणि वृद्धिमान साहा यांनी कॅरेबियनविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. आता जुरेलचाही या यादीत समावेश झाला आहे.
जडेजाची धोनीच्या रेकॉर्डशी बरोबरी
जडेजाने विंडीजविरुद्ध लढतीत दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळी करत शतक ठोकले. जडेजाचे हे या वर्षातील दुसरे आणि कारकीर्दीतील एकूण सहावे कसोटी शतक ठरले. या शतकी खेळीसह त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 6 कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय, जडेजा आपल्या शतकी खेळीत 5 षटकार ठोकून धोनीला मागे टाकत टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा तिसरा बॅट्समन ठरला. जडेजाच्या नावावर आता 80 सिक्सची नोंद झाली आहे तर धोनीने कसोटी कारकीर्दीत 76 षटकार लगावले होते.
केएलचे शिट्टी वाजवून सेलिब्रेशन, 9 वर्षांचा संपवला दुष्काळ
केएलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. परदेशात फलंदाजी करणे सोपे नसते असे म्हटले जाते. कारण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती ही गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. पण केएल राहुलने याच देशांमध्ये आपल्या 11 कसोटी शतकांपैकी 9 शतके झळकावली आहेत. पण त्याला भारतात केवळ 2 शतके झळकावता आली आहेत. याआधी त्याने मायदेशातील पहिले शतक 2016 मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना झळकावले होते. आता दुसरे शतक झळकावण्यासाठी त्याला तब्बल 9 वर्ष वाट पहावी लागली. दरम्यान, शतकानंतर आनंद सेलिब्रेट करताना त्याने शिट्टी वाजवण्याची अॅक्शन केली. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज पहिला डाव 162,भारत पहिला डाव 128 षटकांत 5 बाद 448 (यशस्वी जैस्वाल 36, केएल राहुल 197 चेंडूत 12 चौकारासह 100, साई सुदर्शन 7, शुभमन गिल 50, ध्रुव जुरेल 210 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारासह 125, रवींद्र जडेजा खेळत आहे 176 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारासह 104, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 9, रोस्टन चेस 2 बळी, सील्स, वॉरिकन आणि पियरे प्रत्येकी 1 बळी)