मध्य विभाग-दक्षिण विभाग अंतिम लढत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2025 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरु असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्य विभाग आणि दक्षिण विभाग यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून उभयतांमधील अंतिम लढत 11 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत मध्य विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यातील सामना रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. पण या सामन्यात मध्य विभागाने पश्चिम विभागावर पहिल्या डावात 162 धावांची आघाडी मिळविल्याने पश्चिम विभागाचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 8 बाद 216 धावा जमविल्या. तत्पूर्वी मध्य विभागाने आपला पहिला डाव 8 बाद 556 धावांवर पुढे सुरु केला आणि त्यांचा डाव 600 धावांवर आटोपला. सारांश जैनने नाबाद 63 धावा केल्या. पश्चिम विभागाचा कर्णधार शार्दुल ठाकुर 6 धावांवर बाद झाला. तनुष कोटीयानने नाबाद 40 धावा केल्या. जैस्वालने 70 चेंडूत 64 धावांची खेळी केली. पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 8 बाद 216 धावा जमविल्या असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी निकाल मिळणार नसल्याने खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम विभागाचा पहिला डाव 438 धावांवर आटोपला होता.
या स्पर्धेतील दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात एन. जगदीशनच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर दक्षिण विभागाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण विभागाने पहिल्या डावात उत्तर विभागावर 175 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. दक्षिण विभागाने शेवटच्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 95 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण विभाग प. डाव 536, दु. डाव 24.4 षटकात 1 बाद 95, एन.जगदीशन नाबाद 52), उत्तर विभाग प. डाव 100 षटकात सर्वबाद 361 (शुभम खजुरिया 128, बदोनी 40, निशांत सिद्धू 82, निदेश 3-82, गुरजपनीत सिंग 4-96, निदेश 3-82).