मध्य विभाग दुलीप करंडकाचा मानकरी
दक्षिण विभागावर 6 गड्यांनी विजय, यश राठोड ‘सामनावीर’, सारांश जैन ‘मालिकावीर’
वृत्तसंस्था / बेंगळूर
सोमवारी येथे झालेल्या 2025 क्रिकेट हंगामातील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मध्य विभागाने पटकाविले. अंतिम सामन्यात मध्य विभागाने दक्षिण विभागाचा 6 गड्यांनी पराभव केला. यश राठोडला ‘सामनावीर’ तर सारांश जैनला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. मध्य विभागाला दुलीप करंडक पटकाविण्यासाठी तब्बल 11 वर्षांच्या कालावधीची वाट पहावी लागली.
या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या डावात 149 धावा जमविल्यानंतर मध्य विभागाने पहिल्या डावात 511 धावा जमवित 362 धावांची भक्कम आघाडी दक्षिण विभागावर मिळविली. मध्य विभागाच्या पहिल्या डावात यश राठोडने 194 तर कर्णधार पाटीदारने 101 धावांची खेळी केली. दानिश मालेवार आणि सारांश जैन यांनी अर्धशतके झळकविली.
362 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजीचे दर्शन घडविले. त्यांचा दुसरा डाव 426 धावांवर समाप्त झाला. अंकित शर्माने 1 षटकार आणि 13 चौकारांसह 99 तर सिद्धार्थने 7 चौकारांसह नाबाद 84 धावा तसेच स्मरण रविचंद्रनने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 67 धावा जमविल्या. मध्य विभागातर्फे कुमार कार्तिकेयने 110 धावांत 4 तर सारांश जैनने 130 धावांत 3 गडी बाद केले. दक्षिण विभागाच्या पहिल्या डावात कुमार कार्तिकेयने 53 धावांत 4 तर सारांश जैनने 49 धावांत 5 बळी मिळविले होते. या सामन्यामध्ये सारांश जैनने 9 बळी घेतले. दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी केल्याने मध्य विभागाला हा सामना डावाने जिंकता आला नाही.
मध्य विभागाला सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी 65 धावांची जरुरी होती. पण दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी मध्य विभागाचे चार फलंदाज बाद करून त्यांना झगडण्यास भाग पाडले. दक्षिण विभागाच्या अंकित शर्माने मध्य विभागाचा सलामीचा फलंदाज दानिश मालेवारला यष्टीरक्षक अझहरुद्दीनकरवी झेलबाद केले. त्याने 5 धावा जमविल्या. मध्यमगती गोलंदाज गुरजपनित सिंगने शुभम शर्मा आणि सारांश जैन यांचे बळी मिळविले. गुरजपनित सिंगच्या गोलंदाजीवर शुभम शर्मा यष्टीरक्षक अझहरुद्दीनकरवी झेल बाद झाला. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. गुरजपनित सिंगने यानंतर सारांश जैनला सिद्धार्थ करवी झेल बाद केले. त्याने 4 धावा केल्या. अंकित शर्माने कर्णधार रजत पाटीदारला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. अक्षय वाडकर आणि यश राठोड यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. वाडकरने 3 चौकारांसह नाबाद 19 तर राठोडने 1 चौकारासह 13 धावा केल्या. दक्षिण विभागाच्या गुरजपनित सिंगची रविवारी भारत अ संघामध्ये निवड केली आहे. मध्य विभागाने दुसऱ्या डावात 20.3 षटकात 4 बाद 66 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला. 15 ऑक्टोबरपासून 2025 च्या क्रिकेट हंगामातील रणजी करंडक स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग पहिला डाव सर्वबाद 149, मध्य विभाग प. डाव सर्वबाद 511, दक्षिण विभाग दु. डाव सर्वबाद 426, मध्य विभाग दु. डाव 20.3 षटकात 4 बाद 66 (वाडकर नाबाद 19, राठोड नाबाद 13, पाटीदार 13, मालेवार 5, शुभम शर्मा 8, सारांश जैन 4, गुरजपनित सिंग 2-21, अंकित शर्मा 2-22).