शेतकऱ्यांसोबत 4 मुद्द्यांवर केंद्र सरकारची चर्चा
हरियाणा निवडणुकीदरम्यान उचलले महत्त्वाचे पाऊल : एमएसपीचा मुद्दाही सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत एमएसपीसमवेत अनेक प्रलंबित मुद्द्यांवरून चर्चा सुरू केली आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे. या मुद्द्यांवर तोडगा निघत नाही तोवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत. ही तर केवळ सुरुवात असून आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे चौहान यांनी म्हटले आहे.
एमएसपी व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या असून त्यावर आम्ही विचार करू. शेतकऱ्यांसोबत दर मंगळवारी बैठक घेतली जाईल आणि पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ही पहिल्या फेरीची चर्चा होती आणि शेतकऱ्यांनी यादरम्यान विमा योजनेपासून एमएसपीपर्यंतचे मुद्दे उपस्थित केले आहेत. आम्ही त्यावर विचार करणार असून यापुढेही चर्चा सुरू ठेवण्याबद्दल सहमती झाली आहे. शेतकऱ्यांची सेवा करणे आमच्यासाठी देवाची पूजा करण्यासारखे असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे.
शंभू बॉर्डरवर मोठ्या संख्येत शेतकरी जमले असताना शिवराज सिंह चौहान यांनी ही चर्चा केली आहे. सुमारे 200 दिवसांपासून शेतकरी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर ठाण मांडून असून दिल्लीला जाऊ देण्याची मागणी करत आहेत. अशास्थितीत केंद्र सरकारने चर्चेसाठी हा पुढाकार घेतला आहे. विशेषकरून हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. हरियाणातील शेतकरीवर्गात भाजपबद्दल नाराजी असल्याचे बोलले जाते.
मंगळवारी झालेल्या बैठकीत भारतीय किसान युनियन अराजनैतिकच्या उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधी सामील होते. आम्ही एमएसपी, पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा योजना यासारखे मुद्दे उपस्थित केले. सध्या सरकारकडून या मुद्द्यांवर विचार करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे या शेतकरी नेत्यांनी सांगितले. तर या बैठकीत मागील 7 महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेल्या शेतकरी संघटनांचा कुठलाच प्रतिनिधी सामील झाला नव्हता.