रोहिणी प्रकरणी केंद्र-राज्य सरकारने करावी मदत : तेजप्रताप
वृत्तसंस्था/पाटणा
बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालूप्रसाद यादव यांच्या परिवारातील कलहादरम्यान आता तेजप्रताप यादव यांनी केंद्र आणि बिहार सरकारकडे मदत मागितली आहे. बहिण रोहिणी आचार्यसोबत राबडीदेवींच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तनानंतर लालूप्रसादांच्या ज्येष्ठ पुत्राने स्वत:च्या बहिणीच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. माझ्या आईवडिलांना (लालूप्रसाद आणि राबडीदेवी) मानसिक स्वरुपात छळले जात असून याप्रकरणी चौकशी करविण्यात यावी अशी विनंती तेजप्रताप यांनी मोदी सरकार तसेच बिहार सरकारला केली आहे.
तेजप्रताप यांनी मंगळवारी बहिण रोहिणी आचार्यचे उघडपणे समर्थन केले. तसेच परिवारातील संकटासाठी ‘जयचंद’ जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या आईवडिलांचा कुठल्याही प्रकारे छळ होतोय का याची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि बिहार सरकारने करावी असा आग्रह तेजप्रताप यांनी केला आहे. लालू यादवांची कन्या रोहिणीने राबडीदेवींच्या निवासस्थानात गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने राजकारणातून संन्यास घेण्याची आणि परिवारासोबतचे नाते तोडण्याची घोषणा केली होती.
जयचंदांना जमिनीत गाडणार : तेजप्रताप
रोहिणीसोबत राबडीदेवींच्या निवासस्थानात झालेल्या गैरवर्तनामुळे भडकलेले तेजप्रताप यांनी सर्व जयचंदांना जमिनीत गाडणार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा इशारा तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव तसेच रमीज यांच्याकडे होता. या दोघांची नावे रोहिणीने स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्येही घेतली होती. तसेच तेजप्रताप यांनी स्वत:चा पक्ष जनशक्ती जनता दलाचे संरक्षक होण्याची ऑफर बहिण रोहिणीला दिली आहे. याचबरोबर तेजप्रताप यांनी रालोआ सरकारला स्वत:चे नैतिक समर्थनही जाहीर केले आहे.