सेंट्रा केअर हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन
50 खाटांचे हॉस्पिटल : अभिनेते नाना पाटेकर, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींची उपस्थिती
बेळगाव : टिळकवाडी, रानडे रोड येथील सेंट्रा केअर हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दि. 29 जून रोजी होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख निमंत्रित म्हणून नामवंत अभिनेते नाना पाटेकर, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. तसेच केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, खासदार जगदीश शेट्टर, खासदार इराण्णा कडाडी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ सेठ आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम शगुन गार्डन येथे सकाळी 9.30 वाजता होणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. नीता देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या पुढे म्हणाल्या, सेंट्रा केअरमध्ये अत्यंत आधुनिक उपचार पद्धती परंतु परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. 50 खाटांचे हे हॉस्पिटल असून शहरातील नामवंत आणि तज्ञ असे 30 डॉक्टर हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. हॉस्पिटलला विविध सरकारी योजनांशी संलग्न करण्यात आले आहे. याशिवाय डॉ. के. एच. बेळगावकर चॅरिटेबल फौंडेशनच्या माध्यमातून निधी संकलन करून त्याचा विनियोग गरीब रुग्णांसाठी केला जातो.
उच्च दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली
हॉस्पिटलचे वैशिष्ट्या म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कॉपिक सर्जरी, गायनाकोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, रेस्पिरेटरी मेडिसीन, मानसोपचार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, रेडिओलॉजी, ईएनटी, रुमेटोलॉजी, मधुमेह-लठ्ठपणा आणि चयापचय आरोग्य, इंटेन्सिव्ह मेडिसीन, बॅरिएट्रीक सर्जरी व गॅस्ट्रिक बलुनिंग, पोषण आणि आहारशास्त्र, फिजिओथेरपी आणि कार्डियाक रिहॅबिलिटेशन युनिट, डायलिसिस युनिट आहे. सीटी स्कॅन (रेडिओ-डायग्नोस्टिक्स), फार्मसी, आपत्कालिन सेवा, आयसीयुसह सर्व युनिट्स 24×7 कार्यरत आहेत. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
बेळगावमध्ये प्रथमच सेंट्रा केअर इन्स्टिट्यूट
बेळगावमध्ये प्रथमच सेंट्रा केअर इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस ओबेसीटी अँड मेटाबॉलिझमची सुविधा उपलब्ध असून, मधुमेह तज्ञ, आहारतज्ञ, व फिटनेस तज्ञ यांचा एकत्रित गट मधुमेह, स्थुलत्व नियंत्रणासाठी कार्य करतात. रुग्णाची गरज ओळखूनच हे उपचार एकाच छताखाली केले जातात, असे डॉ. नीता देशपांडे यांनी सांगितले.
वेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल उभारण्याचा मानस
हॉस्पिटलचे संचालक रोहित देशपांडे यांनी वेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल उभारण्याचा मानस होता. जे इतरांपेक्षा वेगळे असेल पण सर्वांसाठी उपलब्ध असेल या हेतूने सेंट्रा केअर सुरू करण्यात आल्याचे सांगितले.अभिनेते नाना पाटेकर हे नामवंत अभिनेते आहेतच परंतु नाम फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम केले आहे. ते स्वत: सत्तरी उलटली तरी अत्यंत कार्यक्षम आहेत. तसेच भिडे गुरुजी 90 चे असले तरी आजही कार्यक्षम आहेत. त्यांचे उदाहरण समाजासमोर ठेवण्यासाठी त्यांना निमंत्रित केल्याचे हॉस्पिटलचे संचालक दीपक करंजीकर यांनी सांगितले. याप्रसंगी हॉस्पिटलच्या सीओओ गौरी कुलकर्णी व चिफ ऑफ क्वॉलिटी सर्व्हिस प्रमोद सुळ्ळीकेरी उपस्थित होते.
रुग्णांना बेळगाव बाहेर जाण्याची गरज भासणार नाही
सेंट्रा केअरचे वैशिष्ट्या म्हणजे येथे कार्डिअॅक रिहॅबिलिटेशन सेंटर असून, हृदय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी 12 आठवड्याचा एक फालोअप कार्यक्रम देण्यात येतो. जेणेकरून पुन्हा रुग्णाला समस्या उद्भवू नयेत व त्याने स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण दिले जाते. सेंट्रा केअरमध्ये 25 बेडचा आयसीयु विभाग असून सेंट्रा केअरमधील तज्ञ डॉक्टरांबरोबरच क्रिटिकल केअर टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच देशभरातील तज्ञ डॉक्टर आयसीयु विभागातील सॉफ्टवेअरच्या साहाय्याने रुग्णांना मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे रुग्णांना बेळगाव बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.