कुपवाडमध्ये सेंट्रींग कामगाराचा धारदार शस्त्राने खून
डोक्यात व छातीवर वर्मी घाव; कारण अद्याप अस्पष्ट, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
कुपवाड :
कुपवाड शहरातील रामकृष्णनगर परिसरात स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर एका सेंट्रींग कामगाराचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. डोक्यात आणि छातीवर वर्मी घाव घालून अमोल रायते (वय ३२) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री अमोल रायते यांच्या घरी मित्रांसह जेवणाची पार्टी सुरू असताना अज्ञात कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मध्यरात्री त्याच परिसरात अमोलचा खून झाला. घटनास्थळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

अमोल रायते हा सेंट्रींग कामगार होता. तो रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिराच्या मागे पत्र्याच्या खोलीत एकटाच राहत होता. त्याची पत्नी काही महिन्यांपासून वेगळी राहत होती. अमोलचा विवाह 2021 साली झाला होता.
खुनानंतर संशयित फरार झाले होते. मात्र, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी मिरजच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कुपवाड पोलिस अधिक तपास करीत आहेत.