For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीट परीक्षा रद्द करण्यास केंद्राचा विरोध

06:11 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीट परीक्षा रद्द करण्यास केंद्राचा विरोध
Advertisement

सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर, नीट-पीजी परीक्षेचा दिनांक घोषित

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

यंदा झालेली नीट-युजी परीक्षा रद्द करावी या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ही परीक्षा योग्यप्रकारे घेण्यात आली असून फार मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. जेथे समस्या निर्माण झाली आहे, तेथे कारवाई केली जात आहे. संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचे कारण नाही असे केंद्राचे म्हणणे आहे.

Advertisement

या परीक्षेचा परिणाम 4 जूनला घोषित करण्यात आला होता. मात्र, या परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याची कथित प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका सादर करण्यात आल्या असून ही परीक्षाच रद्द करण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी न्यायालयात केली आहे.

पुरावे नाहीत

या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले किंवा गोपनीयतेचा भंग झाला असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. परीक्षा नियमांप्रमाणे आणि गोपनीयतेचे काटेकोर पालन करुनच घेण्यात आली होती. आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून तिचा अहवाल लवकरच उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत पूर्ण परीक्षा रद्द करणे तर्कसंगत होणार नाही. या परीक्षेचे परिणामही घोषित करण्यात आले असून सर्वच प्रक्रिया उलटी फिरविणे योग्य ठरणार नाही. तसे केल्यास अनेक समस्या निर्माण होतील, ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो, असे म्हणणे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.

प्रामाणिक विद्यार्थ्यांची हानी शक्य

संपूर्ण परीक्षाच रद्द केल्यास ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा दिली, त्यांची हानी होणार आहे. त्यांना पुन्हा हीच परीक्षा द्यावी लागेल. त्यांच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य होणार नाही. काही स्थानी गैरप्रकारांचे आरोप झाले आहेत, म्हणून सर्वच परीक्षा रद्द करणे अनाठायी ठरु शकेल. केंद्र सरकारने आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. भविष्यकाळात अशा परीक्षा घेताना कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी समिती केंद्र सरकारला सूचना करणार आहे. या सूचना काटेकोरपणे लागू केल्या जातील. भविष्यकाळात अधिक सावधानता बाळगली जाईल, असे सरकारच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले.

आरोप कोणते आहेत...

मे मध्ये झालेल्या नीट-युजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अनेक राज्यांमध्ये फुटल्या होत्या असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बिहार आणि काही राज्यांमध्ये चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची विक्री 30 लाख रुपयांना करण्यात आली असाही आरोप आहे. प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली असून सखोल चौकशी होत आहे. यावर्षी या परीक्षेला 24 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते. आता ते रद्द करण्यात आले आहेत.

नीट पीजीचा दिनांक घोषित

नीट-पीजी प्रवेश परीक्षेचा दिनांक राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकरणाने घोषित केला आहे. त्यानुसार ही परीक्षा 11 ऑगस्टला घेतली जाणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 23 जुलैला होणार होती. तथापि, मध्यंतरीच्या काळात नीट-युजी परीक्षेचा कथित घोटाळा समोर आला होता. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ती 11 ऑगस्टला घेण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारने वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.