जनगणनेची पूर्व चाचणी सुरु
गोव्यात 7 नोव्हेंबरपर्यंत डिजिटल मार्गदर्शन
पणजी : जनगणनेसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झालेल्या वर्ष 2027 च्या पहिल्या टप्प्याच्या पूर्व चाचणीत गोवा राज्यही सहभागी झाले असून जनगणना कर्मचाऱ्यांनी निवडक ठिकाणी नागरिकांना समर्पित ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घरांची माहिती भरण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यास सुऊवात केली आहे. दि. 7 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशाप्रकारे पूर्णपणे डिजिटल स्वऊपात जनगणना होत आहे. त्यात घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना टप्प्यासाठी विकसित केलेली स्व-गणना वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन यांचा समावेश करण्यात आला आहे.
या चाचणी दरम्यान प्रत्येक घरमालकास सुमारे 30 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यात घरप्रमुखाचा तपशील, सदस्यांची संख्या, फ्लॅट वा घर क्रमांक, बांधकाम साहित्य, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, प्रकाश योजना, शौचालये, स्वयंपाकासाठी इंधन व उपकरणे आणि वाहनांची मालकी, मोबाईल क्रमांक, तसेच खाण्यासाठी वापरण्यात येणारे मुख्य अन्नधान्य इत्यादी माहितीचा समावेश असेल.
ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार असून त्यात प्रत्येक घरातील सर्व सदस्यांसाठी जातीची गणना देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व इमारती आणि निवासी संकुलांचा समावेश करून घर यादी नोंद एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान आणि जनगणनेचा अंतिम टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कामासाठी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्त केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 शिक्षक आणि सरकारी कर्मचारी जनगणनाकार आणि पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत.