लोकमान्य श्रीराम मंदिरात उद्यापासून उत्सव
बेळगाव : शहापूर, आचार्य गल्लीस्थित लोकमान्य श्रीराम मंदिर येथे अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने दि. 20 ते 22 जानेवारी हे तीन दिवस भव्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शनिवार दि. 20 रोजी पहाटे 6 वाजता काकडारती, त्यानंतर दैनंदिन अभिषेक व रात्री महाआरती होईल. रविवार दि. 21 रोजी पहाटे 6 वाजता काकडारती, सकाळी 7.30 वा. अभिषेक, सायंकाळी 6.30 वा. रा. स्व. संघाचे विभागीय कार्यवाहक रामचंद्र एडके यांचे ‘श्रीराम मंदिर स्थापनेची चळवळ’ या विषयावर व्याख्यान व रात्री 8 वा. महाआरती होणार आहे. सोमवार दि. 22 रोजी पहाटे 6 वा. काकडारती, त्यानंतर दैनंदिन अभिषेक, सकाळी 9.30 वा. श्रीरामासह अन्य मूर्तींचे विशेष अलंकरण, 10 वा. हभप भैरू महाराज धामणेकर यांचे कीर्तन होणार आहे. 12.28 वाजता आरती व नैवेद्य होऊन 1 वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी 7 वा. बिच्चू गल्ली, शहापूर येथील रावण ढोलताशा पथकाचे वादन होईल. 7.30 वा. फटाक्यांची आतषबाजी होईल.
रा. रा. तुकाराम गणु शालगर या सावजी समाजातील व्यक्तीने स्वखर्चाने हे भव्य दगडी श्रीराम मंदिर आठ गुंठे जागेत बांधवले. मंदिरातील मूर्ती पांढऱ्या संगमरवरात बनविल्या असून त्या राजस्थानहून आणल्या आहेत. सदर मूर्ती हास्यमुख असून मध्ये कोदंडधारी प्रभू श्रीराम, वामांगी माता सीता, उजव्या बाजूस बंधू लक्ष्मण व दासानुदास हनुमंत विराजमान आहेत. सप्टेंबर 2010 मध्ये तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मंदिर हस्तांतरित करून व्यवहार पूर्ण केला. तेव्हापासून लोकमान्य श्रीराम मंदिर म्हणून ते ओळखले जात असून तेथे दररोज पूजा-अर्चा होते. चैत्रातील नवरात्रोत्सव म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम नवमीपर्यंत उत्सव साजरा केला जातो व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शहापूरच्या पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्तांचे हे मंदिर म्हणजे श्रद्धेचे स्थान आहे. सर्व भाविकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर व संचालक मंडळाने केले आहे.