For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशभर रंगोत्सवाचा जल्लोष

06:55 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशभर रंगोत्सवाचा जल्लोष
Advertisement

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांपासून अयोध्या, पुष्कर ते काशीपर्यंत होळी साजरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात सोमवारी होळीचा उत्सव टिपेला पोहोचला होता. रंगांच्या या सणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. रविवारी रात्री देशवासियांनी भक्तिभावाने होलिका दहन केल्यानंतर होळीच्या सणाला प्रारंभ झाला. लोक एकमेकांना रंग आणि गुलाल उधळून होळीच्या शुभेच्छा देताना दिसत होते. देशाच्या विविध भागात होळी साजरी केली जात आहे. होळीनिमित्त देशाच्या बहुतांश भागात सोमवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. तर काही भागात पुढील काही दिवसात वेगवेगळ्या दिवशी रंगांची उधळण केली जाणार आहे.

Advertisement

होळीनिमित्त रविवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या बाजारपेठांमध्ये लोक खरेदी करताना दिसत होते. काहींनी गुलाल तर काहींनी होळ्या खरेदीसाठी बाजारपेठ गाठली होती. लोकांची खरेदी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच लोक उत्सवी वातावरणात तल्लीन झालेले दिसून येत होते. देशाच्या विविध भागांमध्ये लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देताना दिसत होते. परदेशी पाहुण्यांनीही ‘रंगोत्सवा’चा आनंद लुटला. जयपूरच्या बाउंड्री वॉल्समधील बडी चौपार येथे अनेक परदेशी पर्यटक हवामहलच्या आसपासच्या लोकांसोबत होळी खेळताना दिसले. तर, वालुकाशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी होळीच्या शुभेच्छा देताना पुरीतील किनाऱ्यावर वाळूपासून एक कलाकृती तयार केली.

कोलकातामध्ये होलिका दहनाच्या वेळी भाविकांनी पूजा केली. गुजरातमधील राजकोट जिह्यात ‘होलिका दहन’निमित्त जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. होळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील लोकांनी रंगीबेरंगी गुलालाची उधळण केली. तऊणाईने एकमेकांवर रंग उधळल्याने भुवनेश्वरमध्ये होळीचा प्रचंड उत्साह दिसून आला. भुवनेश्वरमधील एका संघटनेने पर्यावरणपूरक आणि हर्बल होळीला प्रोत्साहन देण्यासाठी होळी सणापूर्वी ‘हर्बल होळी’ उत्सवाचे आयोजन केले होते. एकंदर हा सण मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांसोबतच संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा झाला.

सीमेवरही रंगोत्सव, मिठाईवाटप

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराने अखनूरमध्ये होळीचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला जीओसी 16 कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा उपस्थित होते. सैनिकांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आणि रंग लावून सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी होळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. होळी आपल्याला देशाचा सांस्कृतिक वारसा मजबूत करण्याची प्रेरणा देते. होळी हा एक चैतन्यमय आणि आनंदाचा सण असून तो आपल्या जीवनात आशा आणि उत्साह भरतो. होळीचे विविध रंग आपल्या देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत. हा सण लोकांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो, असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्नेह आणि सौहार्दाच्या रंगांनी सजलेला हा पारंपरिक सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन येवो, अशा शुभेच्छा दिल्या.

 

अयोध्या-काशीमध्ये प्रचंड उत्साह

होळीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. होळीच्या दिवशी प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. अयोध्येत गुलालाची उधळण करून भाविकांनी होळी खेळली. दुसरीकडे, महादेवाची नगरी काशी येथे सोमवारी सकाळपासूनच होळीचा उत्साह दिसून येत होता. ठिकठिकाणी तऊण-तऊणींचे गट संगीताच्या तालावर नाचताना दिसले. काशीच्या गोदौलिया चौकात सकाळपासूनच गर्दीतील लोक संगीताच्या तालावर नाचताना दिसत होते. काशीवासियांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने होळीच्या आनंदात भिजले होते. काशीच्या घाटांवरही होळीचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले.

होळीच्या रंगात रंगले राजस्थान

राजस्थानमध्येही पूर्ण उत्साहात होलिकोत्सव साजरा करण्यात आला. लोकांनी एकमेकांच्या तोंडावर रंग आणि गुलाल उधळून होळीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिरांमध्ये गुलालासोबतच फुलांची होळीही खेळली जात होती. लोकांनी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांच्या चेहऱ्यावर गुलाल उधळला. काही गावकरी ढोलताशाच्या तालावर नाचताना दिसले. जयपूरच्या प्रसिद्ध गोविंद देवजी मंदिरात गुलाल होळी खेळण्यात आली.

Advertisement
Tags :

.