For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णी रस्त्यावरील सीडी कोसळली

11:14 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णी रस्त्यावरील सीडी कोसळली
Advertisement

वाहतूक ठप्प : दुचाकीस्वार पडून जखमी, बिजगर्णी इंदिरानगर रस्त्यावरील प्रकार, ग्रा. पं. कडून तातडीची दुरुस्ती

Advertisement

वार्ताहर/किणये

इंदिरानगर बिजगर्णी रस्त्यावरील सीडी गुरुवार सकाळी कोसळली. यामुळे सुमारे तासभर या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. सीडी कोसळलेल्या ठिकाणी काही दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. मुख्य रस्त्यावरील सीडी कोसळल्यामुळे वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर ग्राम पंचायतीने या सीडीच तातडीने तात्पुरती दुरुस्ती केली आहे. गेल्या 40 वर्षापूर्वी बिजगर्णी इंदिरानगर येथील रस्त्यावर सीडीचे बांधकाम केले होते. गेल्या दोन तीन वर्षापासून ही सीडी खराब झाली होती. याचा धोका वाढलेलाच होता. यावर्षीच्या पावसात ही सीडी नक्कीच कोसळणार होती. मात्र गुरुवारीच सकाळी ही सीडी कोसळली. या रस्त्यावरून वाहतूक सुरू होती. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, अशी माहिती माजी ग्राम पंचायत सदस्यांनी दिली.

Advertisement

अवजड वाहतुकीचा परिणाम 

बिजगर्णी इंदिरानगर रस्त्याच्या बाजूलाच अंगणवाडी आहे. तसेच इंदिरानगर वसाहत आहे. या धोकादायक सीडीमुळे इथल्या नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण झाली होती. तसेच या मुख्य रस्त्यावरून टिप्पर व डंपर अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे ही सीडी खराब झाली आहे, अशी माहिती दिली.

पाईप न घातल्याने सांडपाणी निचरा होण्यास अडथळा 

या रस्त्यावरून बिजगर्णी, बेळवट्टी, इनामबडस, मोरब, कावळेवाडी, यळेबैल, सोनोली, राकसकोप, बेळगुंदी व पश्चिम भागातील अनेक गावातील वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात रोज वर्दळ असते. गुरुवारी सकाळी सीडी कोसळल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. बिजगर्णी ग्राम पंचायतीतर्फे या सीडीची दुरुस्ती करण्यात आली. सीडी कोसळलेल्या ठिकाणी दगड व माती टाकली आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी याठिकाणी पाईप घातलेली नाही. केवळ वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, म्हणून गुरुवारी ग्राम पंचायतीने दगड व माती टाकून दुरुस्ती केली आहे. मात्र इंदिरानगर तसेच या परिसरातून येणारे सांडपाणी व पावसाचे पाणी आता याच ठिकाणी साचून राहणार आहे. यावेळी  मनोहर बेळगावकर, बबलू नावगेकर, नामदेव मोरे, संदीप अष्टेकर आदी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

त्वरित नव्याने सीडीच्या बांधकामाची मागणी

सध्या रस्त्यावरील ही सीडी धोकादायक बनली होती. काही ठिकाणी भगदाड पडले होते. गुरुवारी सीडी कोसळल्यानंतर आम्ही ग्राम पंचायतीतर्फे तात्पुरती दुरुस्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सीडीचे कामकाज व्यवस्थित करून पाण्याचा निचरा होण्यासाठी याठिकाणी पाईप घालण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून सदर सीडीचे कामकाज लवकर सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.

- मनोहर बेळगावकर, माजी अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य.

Advertisement
Tags :

.