भुतरामहट्टीत बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या सूचना : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
बेळगाव : पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी संग्राहलयाला नुकतीच भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना त्यांनी संग्रहालय व्यवस्थापनाला केल्या आहेत. शहरापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा अलीकडेच विकास साधण्यात आला आहे. या ठिकाणी सिंह, हत्ती, बिबटे, अस्वल, मगर यासह दुर्मीळ पक्षीही दाखल झाले आहेत. त्यामुळे बेळगावसह कर्नाटक आणि गोवा येथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर शाळांच्या शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जात आहे. त्यामुळे 40 ते 50 पर्यटक दररोज भेट देऊ लागले आहेत. यामध्ये वयोवृद्ध आणि बालकांचाही समावेश आहे. पर्यटकांच्या दृष्टिकोनातून संग्रहालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. अलीकडे संग्रहालयातील सिंह पळून गेल्याची अफवा पसरली होती. अशा अफवांनाही कॅमेऱ्यांमुळे आळा बसणार आहे. शिवाय संग्रहालयातील प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे, अशी माहिती संग्रहालयाचे आरएफओ पवन कनिंग यांनी दिली.