For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंट भरती भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयची निवासस्थानापर्यंत धडक

06:49 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंट भरती भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयची निवासस्थानापर्यंत धडक
Advertisement

कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन चौकशी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरतीतील भ्रष्टाचार प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. मागील चार दिवसांपासून कॅन्टोन्मेंट भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांची पुन्हा सखोल चौकशी सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली जात असल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एकूण 29 कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली. या भरतीवेळी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. शिपाई पदापासून अधिकाऱ्यांपर्यंतची पदभरती करण्यात आली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट दिल्ली येथील सीबीआयकडे चौकशीची मागणी केली होती. याची दखल घेऊन ऑक्टोबर 2023 मध्ये सीबीआयकडून चौकशीला सुरुवात झाली.

बेंगळूर येथील सीबीआयचे पथक तब्बल पंधरा दिवस बेळगावमध्ये ठाण मांडून होते. भरती प्रकरणातील कागदपत्रे व भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून अहवाल तयार केला जात होता. या भ्रष्टाचार प्रकरणात बरेच अधिकारी सामील असल्याची चर्चा कॅन्टोन्मेंटमध्ये रंगत होती. याचदरम्यान कॅन्टोन्मेंटचे तत्कालिन सीईओ के. आनंद यांनी आपले जीवन संपविले होते. यामुळे काही दिवस चौकशी थांबविण्यात आली होती.

बेंगळूर येथून नवे पथक दाखल

महिनाभरापूर्वी सीबीआयचे अधिकारी कॅन्टोन्मेंट कार्यालयात आले होते. त्यांनी भरती प्रकरणातील काही कागदपत्रे आपल्यासोबत नेल्याची माहिती उपलब्ध झाली. मागील चार दिवसांपासून बेंगळूर येथील सीबीआयचे नवे पथक बेळगावमध्ये ठाण मांडून आहे. कॅन्टोन्मेंट क्वॉर्टर्स येथे कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. शनिवारीही तपास यंत्रणांकडून चौकशी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कॅन्टोन्मेंट कार्यालयात शुकशुकाट

कॅन्टोन्मेंट कार्यालय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. अद्याप नव्या टीमकडून कार्यालयात येऊन चौकशी झालेली नसली तरी कर्मचाऱ्यांच्या घरी सखोल चौकशी सुरू आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कोणताच अधिकारी अवाक्षरही बाहेर काढत नसल्याचे एकूण चित्र दिसत आहे.

Advertisement
Tags :

.