सीबीआयचा कॅन्टोन्मेंट बोर्डवर छापा
कागदपत्र-सीसीटीव्हीची तपासणी : निविदांमध्ये अनियमिततेचा ठपका
बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयच्या पथकाने मंगळवारी अचानक छापा टाकला. कॅन्टोन्मेंटमधील निविदा, पार्किंग टेंडर यामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआयने छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत सीबीआयची कारवाई सुरू होती. त्यामुळे कॅम्प परिसरात या कारवाईचीच चर्चा होती. मागील काही दिवसांत कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये काढण्यात आलेल्या निविदा, पार्किंग टेंडरमध्ये अनियमितता असल्याची तक्रार काहींनी सीबीआयकडे केली होती. तसेच काळ्यायादीतील व्यक्तीला कंत्राट मिळवून दिल्याचा आरोपही तक्रारदाराने केला होता. या तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी सीबीआयचे पथक दोन वाहनांनी बेळगावमध्ये दाखल झाले.
कागदपत्रे-सीसीटीव्हीची तपासणी
सीबीआयचे तीन अधिकारी बेळगावमध्ये दाखल होऊन त्यांनी कॅन्टोन्मेंटचा ताबा घेतला. कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. एकीकडे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सीबीआयने छापा टाकल्याने या कारवाईला महत्त्व आले आहे.
पुन्हा चौकशी सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 2023 साली सीबीआयच्या पथकाने छापा टाकत भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली होती. यामध्ये सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अखेर पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सीबीआयकडून चौकशी सुरू झाल्याने कॅन्टोन्मेंटमधील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मध्यरात्रीपर्यंत सीबीआय ठाण मांडून
निविदा प्रक्रियेतील अनियमिततेचे चौकशी करण्यासाठी दाखल झालेले सीबीआयचे पथक मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ठाण मांडून होते. कागदपत्रांची छाननी रात्री अकरा वाजल्यानंतर ही सुरू होती. कॅन्टोन्मेंट बोर्डचे काही प्रमुख अधिकाऱ्यांना कार्यालयातच थांबवण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या चौकशीचा चांगला धसका घेतल्याचे दिसून आले.