For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेपरफुटेनंतर परीक्षा मंडळाची सावध भूमिका

11:59 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेपरफुटेनंतर परीक्षा मंडळाची सावध भूमिका
Advertisement

दहावीच्या सत्र प्रश्नपत्रिका त्याच दिवशी सकाळी अपलोड करणार

Advertisement

बेळगाव : दहावीच्या सत्र परीक्षेचे पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका मिळाल्याने हा संशय बळावला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शालेय परीक्षा मंडळाने परीक्षेच्या अवघे काही तास आधी प्रश्नपत्रिका मुख्याध्यापकांच्या लॉगईन आयडीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाप्रकारे सत्र परीक्षांच्याही प्रश्नपत्रिका फुटत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्यावतीने परीक्षेच्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका शाळा मुख्याध्यापकांच्या लॉगईन आयडीवर दिल्या जात आहेत. मंगळवारपासून दहावीच्या सत्र परीक्षेला सुरुवात झाली असून सोमवार दि. 30 पर्यंत परीक्षा चालणार आहे. एक दिवस आधी दुपारी 1 वाजता संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका  लॉगईन आयडीवर मिळाल्यावर छपाई करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात होत्या. परंतु गुरुवारी दावणगेरी जिल्ह्यात दहावी सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त समोर आले. तसेच काही जिल्ह्यांमध्ये प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. जरी सत्र परीक्षा असल्या तरी दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा मंडळाने तात्काळ याची दखल घेतली.

सकाळी 6 वाजता प्रश्नपत्रिका लॉगईन आयडीवर

Advertisement

शनिवारची प्रश्नपत्रिका शुक्रवारी दुपारी एक वाजता मुख्याध्यापकांच्या लॉगईन आयडीवर दिली जाणार होती. परंतु यामध्ये बदल करण्यात आला. पेपरफुटीच्या घटनेनंतर परीक्षा मंडळाने शनिवारी सकाळी 6 वाजता प्रश्नपत्रिका लॉगईन आयडीवर दिली जाईल, असा संदेश दिला. त्यानंतर शाळांना प्रश्नपत्रिकांची छपाई करावी लागणार आहे. यापूर्वीही अनेकवेळा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या असल्याने परीक्षा मंडळाने आता सावध भूमिका घेतली आहे.

Advertisement
Tags :

.