सर्व हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार होणार उपलब्ध
आता आरोग्य विम्याद्वारे मिळणार सुविधा : यापूर्वी ही सुविधा फक्त टायअप हॉस्पिटलमध्येच
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आरोग्य विमा पॉलिसीधारकांना आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येणार आहेत. म्हणजे आजारी पडल्यास कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. आता विमा कंपनी तुमच्या विमा संरक्षणातून तुमच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलला कॅश-लेस स्वरूपात देणार आहे. ही सुविधा आजपासून सुरू झाली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने काल ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे अध्यक्ष तपन सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. जीआयसीची स्थापना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) 2001 मध्ये केली होती. ती आयआरडीएआय आणि जीवन विमा उद्योग यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते.
आत्तापर्यंत कोणत्या सुविधा होत्या?
आरोग्य विमा पॉलिसी धारकांना पूर्वी ही सुविधा त्यांनी निवडलेल्या विमा कंपनीने हॉस्पिटलशी आधीच करार केला असेल तरच मिळायची. विमा कंपनीने आधीच हॉस्पिटलशी टाय-अप केले नसेल तर त्यांना ही सुविधा मिळत नव्हती. उपचाराचे बिल खिशातून भरावे लागत होते.
कोणत्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार?
कोणत्याही कंपनीचा आरोग्य विमा घेतला असेल, तर देशातील 15 पेक्षा जास्त खाटा असलेल्या व राज्याच्या आरोग्य प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये कॅश-लेस उपचाराचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
ही सुविधा आपत्कालीन परिस्थितीत मिळेल का?
तुमच्या विमा कंपनीचा तुमच्यावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलशी टाय-अप नसेल, तर तुम्ही निवडक शस्त्रक्रिया किंवा उपचार सुरू होण्याच्या 48 तास आधी विमा कंपनीला कळवणे गरजेचे असते. अगदी आपत्कालीन परिस्थितीतही, तुम्हाला 48 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे लागेल, तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकाल. सर्व पॉलिसीधारकांना ही सुविधा मिळेल, कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा सध्याच्या पॉलिसी धारकांना तसेच यानंतर पॉलिसी घेणाऱ्या लोकांना उपलब्ध असेल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क प्रीमियम किंवा वेगळे शुल्क भरावे लागणार नाही.
सध्या फक्त 67 टक्के विमाधारकांना लाभ
जीआय कौन्सिलचे आरोग्य विमा संचालक सेगर संपतकुमार यांनी सांगितले की, सध्या, सुमारे 63 टक्के लोक टाय-अप हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधेचा लाभ घेत आहेत.