‘स्वयंपूर्ण गोवा’ ध्येयासाठी काजू महोत्सव
वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन : काजू महोत्सवाचा उत्साहात समारोप
पणजी : गोवा काजू महोत्सव हा राज्य महोत्सवाच्या ऊपाने आयोजित होत असला तरी या उत्सवाची व्याप्ती वाढत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या मालाचा दर्जा लोकांसमोर यावा यासाठीही प्रयत्न होत आहेत, त्यामुळे महोत्सवाचे महत्त्व आणखी वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आत्मनिर्भर भारत बनण्याकडे वाटचाल करीत आहे. त्याच दिशेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे ध्येय बाळगले असून ते काजू महोत्सवामुळे साध्य होत आहे. त्याला वन मंत्रालयाचेही सहकार्य लाभत आहे, असे वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
काजू महोत्सवाच्या समारोप सोहळ्यादरम्यान डॉ. राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काजू महोत्सवाचे महत्त्व आणि त्याची गरज याविषयी भाष्य केले. त्यांनी काजू महोत्सवामुळे पारंपरिक व्यावसायाची ओळख वाढली असल्याचे सांगितले. गोव्यात तयार होणाऱ्या काजूवर साकोर्डा येथे प्रक्रिया केली जात आहे. आफ्रिका देशानंतर गोव्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सरकारमार्फत काजू उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक आधारभूत किंमत देणारे गोवा हे एकमेव राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
काजू महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात रात्री आठनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु काजूचे पेय आणि संगीत याच्या तालावर जमलेल्या काजू महोत्सव प्रेमींनी एकच ठेका धरला. काही नागरिक स्टॉलच्या ठिकाणी गर्दी करू लागले. काही काळ व्यत्यय आला असला तरी नागरिकांनी काजू महोत्सवाचा परिसर सोडला नसल्याने आयोजकांनाही नागरिकांचे कौतुक वाटले आणि त्यानंतर पुन्हा संगीत सुरू करण्यात आले. दरम्यान, काजू महोत्सवादरम्यान पणजीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पावसातच आपली सेवा बजावली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.
काजूचा जोश... संगीताचा ठेका अन् पावसाची बहार
काजू महोत्सव हा गोव्याचा पारंपरिक उत्सव असला तरी या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, त्याचा प्रत्यय यंदाच्याही काजू महोत्सवात आला. पावसाने हजेरी लावूनसुद्धा लोक पावसातच भिजत गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरून होते. त्यामुळे आयोजकांना संगीत बंद न करता ते सुरूच ठेवावे लागले. हातात काजू मद्य असलेले ग्लास आणि नृत्य यामध्येच पुऊषांबरोबरच महिलांचेही नाचगाणे सुरूच होते.