Satara News : कोरेगावच्या उत्तर भागात आढळले बिबट्याचे ठसे
कोरेगावमध्ये बिबट्याचा वावर
एकंबे : कोरेगाव शहरातील उत्तर भागात नवीन एसटी स्टैंड परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याची खळबळ उडाली आहे. नवीन कुमठे रस्ता, लमाणवस्ती, डेरे वस्ती रस्ता, तडवळे रस्ता परिसरात बिबट्याने जुनी रेल्वे लाईन ओलांडून शेताच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्याची माहिती मिळाली आहे.
नवीन एसटी स्टॅडच्या उत्तरेकडील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरपडे यांनी पाहून तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तातडीने शोधमोहीम हाती घेतली. वनरक्षक विजय नरळे, सुनील शेटे, वनपाल दीपक गायकवाड, प्रतीक गायकवाड यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह परिसराची पाहणी केली. बिबट्या दिसला नसला तरी त्याचे स्पष्ट ठसे आढळून आले असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी सांगितले.