‘कॅश फॉर जॉब’चे लोण पोहोचले सत्तरीत
सत्तरीतील माणिकराव राणेच्या आवळल्या मुसक्या : पाचजणांना मिळून तब्बल 21.50 लाखांना गंडविले
डिचोली : ‘कॅश फॉर जॉब’चे लोण सध्या गोवाभर गाजत असताना आणि रोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येत असतानाच काल शुक्रवारी डिचोली पोलिसस्थानकात दाखल झालेल्या तक्रारीवरून सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने 21.5 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी रावण, केरी-सत्तरी येथील माणिकराव राणे याला डिचोली पोलिसांनी गजाआड केले आहे. वन म्हावळिंगे येथील शीतल सावळ यांच्यासह पूजा येंडे, दिनेश गावकर, अभिषेक गावकर, सत्यवान धुरी यांच्याकडून माणिकराव राणे याने पोलिस खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 21 लाख 50 हजार रू. घेतले. परंतु नोकरी काही दिलीच नाही. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर वरील सर्वांनी डिचोली पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासकाम हाती घेताना माणिकराव राणे याला अटक केली. माणिकराव गायब झाला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी उपनिरीक्षक विकेश हडफडकर, हवालदार नीलेश फोगेरी, कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर, सचिन गावस यांनी बरीच मेहनत घेऊन त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोली उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली व निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज धावसकर अधिक तपास करीत आहेत.