Kolhapur News : इचलकरंजीत मारहाण, दगडफेक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
विद्यानिकेतन मैदानात युवकाला मारहाण
इचलकरंजी : किरकोळ कारणावरून सुरू झालेल्यावादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातून घर व दुकानावर दगडफेक करण्यात आली. या घटनेप्रकरणी अक्षय पाखरे व अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुशांत चंद्रकांत कदम (वय २२, रा. बावडेकर चाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सुशांत हा विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानात मित्रांसोबत उभा असताना संशयित अक्षय पाखरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी बिनाकारण त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार काही जणांनी थांबवला.
त्यानंतर सुशांत घरी जाताना रात्री पुन्हा संशयित तिघांनी पाठलाग करत त्याला शिवीगाळ केली. तसेच सुशांत याच्या सलून दुकानासह घराबर दगडफेक केली. घराच्या खिडक्या व दुकानाच्या फलकाची तोडफोड केली. दुकानाच्या दारात असलेल्या दोन मोपेडचीही दगड मारत नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.