विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल
मुख्याध्यापिकासह सात शिक्षकांना ताब्यात
कारवार : नववीच्या वर्गात शिकणाऱ्या त्या चार विद्यार्थिनींच्या मृत्यूला जबाबदार ठरवून कोलार जिल्ह्यातील मुळेबागीलू मोरारजी देसाई निवासी शाळेतील मुख्याध्यापिकासह सात शिक्षकांना मुरडेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या मंगळवारी निवासी शाळेतील 47 विद्यार्थी मुरडेश्वर सहलीसाठी आले होते. त्यावेळी कांही विद्यार्थी पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी आरबी समुद्रात उतरले होते. यापैकी श्रावंती, दीक्षा, लावण्या आणि वंदना या चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाल. या दुर्घटनेला मुख्याध्यापिका आणि अन्य शिक्षकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून मुरडेश्वर पोलिसांनी स्वयंप्रेरीत शिक्षकांवर गुन्हा दाखल केला होता. सहलीच्या वेळी शिक्षकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून यापूर्वीच मुख्याध्यापिकेसह सर्व शिक्षकांना सेवेतून हटविले आहे. आता या सर्व शिक्षकांना चौकशीसाठी मुरडेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावे शशीकला, लक्कम्मा, विश्वनाथ, चौडप्पा, सुनील, शारदम्मा आणि सुरेश अशी आहेत.
शिक्षकांनी नियमांचे केले उल्लंघन
शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत कांही मार्गदर्शक तत्वे आणि नियम घालून दिले आहेत. मोरारजी शाळेच्या शिक्षकवर्गाने सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे, असे उघडकीस आले आहे. संबंधित खात्याने सहलीचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला होता. तथापि, शिक्षकवर्गाने आपली मनमानी करून हा कालावधी तीन दिवसांचा केला होता. सहलीसाठी सरकारी बसचा वापर केला होता. तथापि, मोरारजी देसाई शाळेच्या शिक्षकांनी सहलीसाठी खासगी वाहनांचा वापर केला होता, असे सांगण्यात आले.
दुर्घटनेचे खापर जिल्हा प्रशासनाच्या माथ्यावर
दरम्यान मुरडेश्वर येथील दुर्घटनेचे खापर शिक्षकांच्या बरोबरीने जिल्हा प्रशासनाच्या माथ्यावर फोडण्यात येत आहे. कारण शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचा हंगाम सुरू आहे. या शिवाय 2024 वर्ष संपत आल्याने सर्वसामान्य नागरिकही मुरडेश्वर येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे मुरडश्श्वर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या महासागर लोटला आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्र किनाऱ्यावरलगतची जागा पार्किंगसाठी अपुरी पडत आहे.