For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हत्तींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

01:06 PM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
हत्तींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
Advertisement

हिंडलगा कारागृहात रवानगी : हत्तींचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथील शेतकरी गणपती सातेरी गुरव यांच्या शेतातील झटका करंटच्या (आयबेक्स) कुंपणाला घरातून विद्युतप्रवाह जोडण्यात आला होता. विद्युतप्रवाह सुऊ असलेल्या कुंपणाला हत्तींचा स्पर्श झाल्याने दोन हत्तींचा रविवारी मृत्यू झाला. हत्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गणपती गुरव याच्यावर नागरगाळी वनखात्याने खानापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

तालुक्यातील सुलेगाळी येथील शेतकरी गणपती गुरव यांनी आपल्या शेताचे संरक्षण करण्यासाठी आयबेक्स झटका करंटचे कुंपण केले होते. या कुंपणात घरातून मुख्य विद्युतवाहिनीचा प्रवाह प्रवाहित केल्याने रविवारी रात्री दोन हत्तींचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्यानी आणि हेस्कॉमने सखोल चौकशी करून शेतकऱ्यानेच झटका कुंपणात मुख्य विद्युतवाहिनी जोडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्याआधारे गणपती गुरव याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

सोमवारी हेस्कॉमचे इलेक्ट्रीक इन्स्पेक्टर रश्मी हंची, भरतेश नागनूर, बेळगाव विभागाचे अभियंते विनोद केरुर, तसेच व्हीजीलन्स विभागाचे निरीक्षक श्रीदेवी पाटील, अभियंते बंगार शेट्टर, खानापूर विभागाचे नागेश देवलत्तकर, व्ही. एम. चकडीमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुन्हा तपासणी केली असता घरातील विद्युत प्रवाह झटका करंट कुंपणाला जोडण्यात आला होता. त्यामुळेच हत्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी गणपती गुरव याच्याविरोधातही खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

हत्तींचे शवविच्छेदन

सोमवारी दोन्ही हत्तींचे शवविच्छेदन पशुवैद्य डॉ. अय्याज, डॉ. नागराज हुईलगोळ आणि डॉ. मधुसूदन यांच्या पथकाने पोलीस आणि नागरगाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. यानंतर याच ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मृत हत्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीसीएफ एन. ई. क्रांती, एसीएफ शिवानंद मगदूम, नागराज बालेहोसूर, खानापूर वनाधिकारी सुनीता निंबरगी, काळी व्याघ्र अभयारण्याचे वन्यजीव संरक्षक, पर्यावरणवादी, नागरगाळी ग्रा. पं. पीडीओ, सदस्य, वन अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते.

खानापूर ब्लॉक काँग्रेस शेतकऱ्याच्या पाठीशी

हत्तींच्या मृत्यूबाबत वनखाते आणि हेस्कॉम जबाबदार असताना शेतकऱ्याला दोषी ठरवून शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत खानापूर काँग्रेस शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. वनखात्याने आणि हेस्कॉमने पारदर्शकपणे चौकशी करून कारवाई करणे गरजेचे होते. मात्र आपल्या बचावासाठी शेतकऱ्याचा बळी देण्यात येत असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला आहे.

हत्तींच्या मृत्यूची सखोल चौकशी करा : वनमंत्री ईश्वर खंड्रे

सुलेगाळी, ता. खानापूर येथे विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू झाला आहे. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना वनखात्याच्या वरिष्ठांना केली आहे. सुलेगाळी येथील गणपती गुरव यांच्या शेतात ही घटना घडली आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी राज्याच्या मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशीची सूचना केली आहे. हत्तींचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे, असेही वनमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून याच भागात हत्तींचा संचार होता. वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दोन हत्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच पाच दिवसांत या संपूर्ण घटनेसंबंधी अहवाल देण्याचे ईश्वर खंड्रे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.