For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हा दाखल...कारवाई कधी?

11:15 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुन्हा दाखल   कारवाई कधी
Advertisement

कॅन्टोन्मेंट गैरव्यवहार प्रकरण : कॅम्प परिसरात चर्चांना उधाण

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये झालेल्या कर्मचारी भरतीवेळीच्या गैरव्यवहार प्रकरणाचा नुकताच छडा लावण्यात आला. भरती करण्यासाठी 15 ते 25 लाख रुपयांची रक्कम घेतल्याबद्दल 5 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 2022-23 या वर्षात एकूण 29 पदांसाठी भरती करण्यात आली. भरती करताना आपले नातेवाईक तसेच परिचयातील व्यक्तींना अधिकाऱ्यांकडून संधी देण्यात आली. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत नोकरी देण्यात आल्याची तक्रार कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी सीबीआय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही केली होती. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समजताच तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू केली.

नोव्हेंबर 2023 पासून बेंगळूर येथील सीबीआयकडून चौकशी सुरू होती. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डचे पाच अधिकारी व 14 उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कॅन्टोन्मेंटचे कार्यालयीन अधीक्षक महालिंगेश्वर ताळूकर, कॉम्प्युटर ऑपरेटर बसवराज गुडोडगी, डाटा एंट्री ऑपरेशन प्रकाश गौंडाडकर, मुख्याध्यापक परशराम बिर्जे, साहाय्यक शिक्षक उदय पाटील यांच्यावर सीबीआयने बेंगळूर येथे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची बातमी कळताच रविवारी कॅम्प परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. कोणतेही विकासकाम करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. सीबीआयने शुक्रवारी गुन्हा दाखल केला असून संशयितांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे दोषींवर कोणती कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.