कार्लसनची प्रज्ञानंद, एरिगेसीवर मात
वृत्तसंस्था/ लास वेगास, अमेरिका
फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममध्ये अर्जुन एरिगेईसीला 2-0 आणि आर. प्रज्ञानंदला 3-1 असे पराभूत करून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने पुन्हा लय मिळवली. ही स्पर्धा आता संपण्याच्या वाटेवर आहे. हॅन्स मोके निमन अंतिम फेरीत त्याचा अमेरिकन सहकारी लेव्हॉन अॅरोनियनशी सामना करणार असून 7 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत कार्लसन तिसऱ्या स्थानासाठी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकी बुद्धिबळपटू हिकारू नाकामुराशी लढेल.
कार्लसनसाठी हे दोन सामने खूप महत्त्वाच्या ठरले. कारण त्याच्या जेतेपद मिळविण्याच्या आकांक्षांवर प्रज्ञानंदने त्याला यापूर्वी पराभूत करून पाणी टाकले होते. भारतीय खेळाडूने त्यांच्या पहिल्या गेममध्ये जगातील या सर्वोत्तम खेळाडूविऊद्ध आणखी एक विजय मिळवला. पण नॉर्वेजियन खेळाडूने परतीच्या गेममध्ये पुनरागमन केले आणि पुढील गेम्स जिंकून विजयाची नोंद केली. त्याच्या पुढच्या सामन्यात अर्जुनला पहिल्या गेममध्ये चांगल्या सुरुवातीमुळे काही प्रमाणात अनुकूलता मिळाली. पण तो ती टिकवून ठेवू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही कार्लसनने पुन्हा आपली श्रेष्ठता सिद्ध केली.
अंतिम दिवशी होणाऱ्या इतर सामन्यांमध्ये अर्जुन पाचव्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाचा सामना करेल, तर प्रज्ञानंदला सातव्या स्थानासाठी अमेरिकेच्या वेस्ली सोविऊद्ध लढावे लागेल. दुसरीकडे, नाकामुराने स्वत: कबूल केले की, तो भाग्यवान ठरला आहे. वेस्ली सोविऊद्ध 1.5-0.5 अशा फरकाने विजय मिळविलेल्या नाकामुराने फॅबियानो काऊआनाला 3-1 असा पराभूत केले. हा सामना बऱ्याच वेळा दोन्ही बाजूंनी हेलकावे खाताना दिसला. शेवटच्या दिवशी सर्वांचे लक्ष निमनवर असेल, जो शेवटच्या 8 खेळाडूंच्या टप्प्यातील सर्वांत खालच्या क्रमांकाचा खेळाडू आहे आणि पुनरागमन केलेल्या अॅरोनियनविऊद्ध 2 लाख अमेरिकन डॉलर्सच्या इनामासाठी तो लढणार आहे.