प्रज्ञानंद अलिरेझाकडून पराभूत, कार्लसन आघाडीवर
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेन्गर (नॉर्वे)
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली या भारतीय भाऊ-बहीण जोडीला आपापल्या विभागात पराभवाला सामोरे जावे लागले, तर मॅग्नस कार्लसनने सूर हरवलेल्या डिंग लिरेनवर विजय मिळवून एकट्याने आघाडी प्राप्त करत आपले अव्वल पद सार्थ ठरवले आहे. 12 गुणांनिशी कार्लसन आघाडीवर आहे.
फॅबियानो काऊआनानेही देशबांधव हिकारू नाकामुरावर मात करून कार्लसनला 1 लाख 61 हजार अमेरिकी डॉलर्सची एकूण बक्षीस रक्कम असलेल्या आणि सहा खेळाडूंच्या या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत आघाडी मिळविण्यास मदत केली. प्रज्ञानंदला आर्मागेडन टायब्रेकरमध्ये फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाकडून पराभूत व्हावे लागले. अलिरेझाविरुद्धच्या क्लासिकल लढतीमध्येही त्याला थोडासा त्रास सहन करावा लागला, तर वैशालीला जागतिक महिला विजेती चीनची वेनजून जू हिच्याकडून पराभूत व्हावे लागले.
दोन्ही विभागांमध्ये चार फेऱ्या बाकी असताना कार्लसनच्या पाठोपाठ आता 11 गुणांनिशी नाकामुरा आहे, तर प्रज्ञानंद 9.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अलिरेझा एकूण आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि काऊआना 6.5 गुणांसह त्याच्यापाठोपाठ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनचा डिंग लिरेन आतापर्यंत केवळ 2.5 गुण मिळवू शकला असून तो स्पर्धेतून बाहेर पडल्यात जमा आहे. त्याला स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी चमत्काराची गरज आहे.
महिला विभागात वेनजूनने युक्रेनच्या अॅना मुझीचूकसह वैशालीकडून आघाडी हिसकावून घेतली. अॅनाने चीनच्या टिंगजी लेईविऊद्ध आर्मागेडॉनमध्ये जोरदार संघर्ष केल्यानंतर विजय मिळविला. वेनजून आणि मुझीचूक या दोघांचे समान 10.5 गुण आहेत. या दोघी वैशालीपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहेत. लेई सात गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कोनेरू हम्पीवर तिने दोन गुणांची आघाडी मिळविली आहे. हम्पीला आर्मागेडनमध्ये स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगसमोर आणखी एक पराभव पत्करावा लागला. क्रॅमलिंगचे आता 4.5 गुण झाले आहेत आणि ती अजूनही तळाशी आहे.