कार्लसनचा साम्रज्याला भारतीयांचा धडका!
गॅरी कास्पारोव्ह, अनातोली कारपोव्ह, विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाच्या इतिहासात खरंखुरं अधिराज्य गाजविलंय ते मॅग्नस कार्लसननंच....एखाद्या जर्मन रणगाड्यासारखा तो प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान इतकी वर्षं चिरडत आलाय. मात्र अलीकडच्या वर्षांत त्याच्या साम्राज्याला आव्हान मिळू लागलेलं असून त्यात आघाडीवर आहे ती युवा भारतीय ‘ब्रिगेङ’...
वर्ष 2013...‘त्यानं’ भारताच्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली...त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा जगज्जेतेपद मिळविलं ते आनंदचं आव्हान मोडीत काढूनच. ‘त्यानं’ या कामगिरीचं दर्शन घडविलं होतं ते ‘फिडे’ क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल क्रमांक मिळविल्यानंतर चार वर्षं संपण्यापूर्वीच...मग सुरू झालं एक नवीन युग अन् ‘त्याच्या’वर वर्चस्व मिळविणं अशक्यच बनलं...रशियाचे गॅरी कास्पारोव्ह व अनातोली कारपोव्ह यांच्याप्रमाणं ‘तो’ देखील बनला इतिहासातील एक सर्वोत्तम, महान खेळाडू...नाव : नॉर्वेचा अजिंक्यवीर मॅग्नस कार्लसन...
सध्या 34 वर्षांच्या असलेल्या या खेळाडूनं ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळविला होता तो तब्बल दोन दशकांपूर्वी. त्यानंतर मॅग्नस एकेक पायरी चढत गेला नि बनला 2900 च्या ‘एलो रेटिंग’चा टप्पा पार करणारा विश्वातील पहिलवाहिला बुद्धिबळपटू. तथापि, कार्लसननं हा पराक्रम केलाय तो ‘फ्रीस्टाईल’ गटात...पण त्याला 2011 नंतर जागतिक बुद्धिबळ जगतावर वर्चस्व गाजवूनही अनेक बुद्धिबळपटूंकडून धक्क्यांना तोंड द्यावं लागलंय. सध्या तर भारतीय ‘ग्रँडमास्टर्स’नी मॅग्नस कार्लसनला बऱ्यापैकी शह दिलाय. या युवा बुद्धिबळपटूंनी भारताला खेळातील पूर्वाश्रमीच्या सोविएत युनियनच्या धर्तीवर ‘पॉवर हाऊस’ बनविलंय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये...
भारतीय खेळाडूंविरुद्ध नमतं घ्यावं लागणं ही कार्लसनच्या दृष्टीनं नवीन बाब राहिलेली नाही...सर्वप्रथम त्याच्यावर 2005 साली लुसान यंग मास्टर्समध्ये मात केली ती ‘ग्रँडमास्टर’ पेंटाला हरिकृष्णनं...‘ग्रँडमास्टर’ विश्वनाथन आनंदनं मॅग्नसच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेकदा पराभवाचा धक्का दिला होता. पाच वेळा जागतिक अजिंक्यपद मिळविणारा आनंद 2007 ते 2012 या कालावधीत नि:संशयपणे हरविण्यास अतिशय कठीण असा खेळाडू राहिला. विशेष म्हणजे 2022 सालच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतही मॅग्नस कार्लसनला पराभवाचा सामना करावा लागला तो आनंदविरुद्धच...
नॉर्वेच्या अजिंक्यवीरावर मात करणारा तिसरा भारतीय म्हणजे कार्तिकेयन मुरली. 2023 सालच्या कतार मास्टर्समध्ये त्यानं या कामगिरीचं दर्शन घडविलं होतं...त्यानंतर भारताच्या नवीन युवा ‘गोल्डन जनरेशन’मधील रमेशबाबू प्रज्ञानंद हा गेल्या वर्षी त्याचं आव्हान मोडीत काढणारा पहिला बुद्धिबळपटू. त्यानं विजय मिळविला तो नॉर्वेच्याच भूमीवर...पुढं अर्जुन एरिगेसीनं मॅग्नस कार्लसनचे टाटा स्टील ब्लिट्झमध्ये कोलकात्यात तीन तेरा वाजविले होते ते अवघ्या 20 चालींत...2024 हे भारताच्या दृष्टीनं बुद्धिबळ खेळातील सर्वांत महत्त्वाचं वर्ष ठरलं. गुकेश डोमाराजू हा सर्वांत तरुण विश्वविजेता बनला, तर ‘चेस ऑलिम्पियाड’च्या दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपद मिळविलं ते आम्हीच. असा पराक्रम नेंदविणारा भारत बनलाय फक्त तिसरा देश...
मॅग्नस कार्लसननं नेहमीच नवीन फ्रीस्टाईल पद्धतीला पाठिंबा दिलाय आणि लुसान इथं मुख्यालय असलेल्या ‘फिडे’वर सातत्यानं टीका केलीय. त्यानं मारलेल्या काही तीरांचा रोख जागतिक बुद्धिबळ संघटनेचे 2022 पासून उपाध्यक्ष असलेले विश्वनाथन आनंद यांच्या दिशेनंही राहिलाय...कार्लसन व गुकेश यांच्यात पहिल्यांदा लढत झाली ती यंदाच्या नॉर्वे बुद्धिबळमध्ये. तिथं आणि क्रोएशिया येथील सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्ल्टि्झ स्पर्धेत अशा दोन्ही वेळा डी. गुकेशनं त्याच्यावर मात केली अन् त्याला दुबळा खेळाडू म्हणण्यापर्यंत मजल मारलेल्या नॉर्वेच्या महान खेळाडूचं तोंड बंद केलं...
नॉर्वे इथं तर पटावरील परिस्थिती अत्यंत वाईट असून देखील गुकेशनं कार्लसनला हरविलं आणि नोंद केली ती कारकिर्दीतील एका सर्वांत मोठ्या विजयाची. लढत संपल्यानंतर मॅग्नसनं केलेलं वर्तन जग निश्चितच विसरणार नाही. कारण एरव्ही शांत राहणारा हा खेळाडू आपली उद्विग्नता लपवू शकला नाही....झाग्रेबमधील विजय तर जास्तच महत्त्वाचा. कारण डी. गुकेशनं तो मिळविला होता ‘रॅपिड’मध्ये. भारतीय खेळाडू या प्रकारात फारसा बलवान नाही हे सर्वांनाच माहीतंय....त्यावर बोट ठेऊन या स्पर्धेपूर्वी मानसिक युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅग्नस कार्लसननं गुकेशबद्दल केलेल्या चिथावून टाकणाऱ्या टिप्पण्या काही कमी गाजल्या नव्हत्या...
त्यावेळी मॅग्नस म्हणाला होता की, तो आगामी स्पर्धेत कमकुवत स्पर्धकांपैकी एकाशी मुकाबला करावा लागत असल्याप्रमाणं खेळेल. शिवाय त्यानं कमी वेळेच्या प्रकारात खेळण्याच्या गुकेशच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचं कारण लपलं होतं ते भारतीय खेळाडूच्या ‘क्लासिकल’मधील विश्वविजेत्याच्या दर्जापेक्षा लक्षणीयरीत्या खाली असलेल्या रॅपिड (42 वं) आणि ब्लिट्झ (93 वं) गटांतील ‘फिडे रेटिंग’मध्ये...डोमाराजू गुकेशनं या ठिकाणी त्यापूर्वी केलेल्या चांगल्या कामगिरीची त्यानं दखल घेतली होती. परंतु अव्वल खेळाडूंसमोर त्यानं आपलं प्राविण्य सिद्ध करणं अजून बाकी आहे, असं मतही व्यक्त केलं होतं. या सार्वजनिक आव्हानामुळं तेल आणखी ओतलं गेलं...
अमेरिकेत नुकत्याच संपलेल्या ‘फ्रीस्टाईल चेस ग्रँड स्लॅम स्पर्धे’त मॅग्नस कार्लसनला 39 चालींत मार खावा लागला तो प्रज्ञानंदकडून. त्यानं यावेळी खेळताना असंख्य चुका केल्या. या स्पर्धेत प्रज्ञानंद व अर्जुन एरिगेसी यांच्यापेक्षा वरचा क्रमांक त्याला मिळालेला असला, तरी जेतेपदाची संधी हिरावून घेणाऱ्या त्या पराभवाला तो खात्रीनं विसरणार नाही...त्यापूर्वी नऊ वर्षांचा कँडिडेट मास्टर आरित कपिल याच्याविरुद्ध ‘चेस डॉट कॉम’च्या स्पर्धेत खेळताना मॅग्नस हरता हरता बचावला होता...
गेल्या वर्षभरात फक्त भारतीयांनीच मॅग्सन कार्लसनला आव्हान दिलंय असं नाही, तर जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट किमरनं देखील त्याला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ‘चेस व्हिसेनहॉस फ्रीस्टाईल स्पर्धे’च्या उपांत्य सामन्यात हरविलं होतं आणि त्यानंतर ती जिंकलीही होती...परंतु गुकेश, प्रज्ञानंद नि अर्जुन एरिगेसी यांना मॅग्नस कार्लसन जेव्हा तोंड देतो तेव्हा एक वेगळं वातावरण निर्माण होतं हे मानावंच लागेल...तो अजूनही विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू आहे यात शंकाच नाही आणि प्रतिस्पर्ध्यानं एक मुक्का लगावल्यास आपल्यामध्ये बदल्यात दोन दणके देण्याची ताकद लपलीय हे त्यानं ‘नॉर्वे चेस’ व ‘सुपरयुनायटेड क्रोएशिया’ जिंकून सिद्धही केलंय. मात्र मीडियानं मोठमोठ्या बातम्या दिल्या त्या गुकेशनं त्याच्यावर मिळविलेल्या विजयांच्या...येऊ घातलेल्या काळात भारताच्या ‘गोल्डन जनरेशन’कडून कार्लसनला देण्यात येणारं आव्हान आणखी तिखट होणार अन् गाजणार हे 100 टक्के निश्चित !
मॅग्नस कार्लसनची सुरुवातीची झेप...
- मॅग्नस कार्लसनचा जन्म 30 नोव्हेंबर, 1990 रोजी झाला तो नॉर्वेतील टोन्सबर्ग इथं...त्याचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर...मॅग्नसला बुद्धिबळाच्या पटाचा वयाच्या पाचव्या वर्षी परिचय झाला तो वडिलांनी त्याला हा खेळ कसा खेळायचा हे शिकवल्यानं...
- आठव्या वर्षी कार्लसननं स्थानिक स्पर्धांमध्ये खेळायला सुऊवात केली आणि लवकरच त्याची झपाट्यानं वाढ पाहायला मिळू लागली..नऊ वर्षांचा होईपर्यंत त्याला त्याच्या वयोगटातील नॉर्वेमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानलं जाऊ लागलं...
- 2004 मध्ये मॅग्नस 13 वर्षं, 4 महिने व 27 दिवस वयावर त्यावेळचा जगातील सर्वांत तऊण बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला...विश्वातील अव्वल क्रमांकावर आरूढ होणारा सर्वांत तऊण खेळाडू ठरण्याचा पराक्रमही आहे तो त्याच्याच नावावर. ही कामगिरी त्यानं नोंदविली 2010 मध्ये अन् त्यावेळी त्याचं वय होतं 19 वर्षं नि 32 दिवस इतकं...
- कार्लसननं पहिलं मोठं यश मिळविलं ते 2006 साली नॉर्वेजियन बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकून...2009 मध्ये त्यानं नेदरलँड्समध्ये प्रतिष्ठित कोरस बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. हा किताब जगातील अव्वल खेळाडू म्हणून त्याला प्रस्थापित करून गेला...
अद्वितीय कार्लसन...
- 2013 मध्ये मॅग्नस कार्लसन सर्वप्रथम जगज्जेता बनला तो विश्वनाथन आनंदला हरवून. पुढच्या वर्षी त्यानं आनंदचाच सामना करत आपलं जेतेपद राखलं आणि 2014 ची ‘वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप’ तसंच ‘जागतिक ब्लिट्झ स्पर्धा’ या दोन्हींचे किताब पटकावले...त्यासरशी एकाच वेळी तिन्ही मुकुट परिधान करणारा तो पहिला खेळाडू बनला. याची त्यानं पुनरावृत्ती केली ती 2019 आणि 2022 साली...
- 2016 मध्ये सर्जेई कर्जाकिन, 2018 साली फाबियानो काऊआना आणि 2021 मध्ये इयान नेपोम्नियाची यांचं आव्हान मोडीत काढत मॅग्नसनं आपलं ‘क्लासिकल’ प्रकारातील जगज्जेतेपद राखलं. मात्र प्रेरणा कमी असल्याचं कारण देत 2023 मध्ये किताब राखण्यापासून दूर राहण्याचा त्यानं जगावेगळा निर्णय घेतला...
- कार्लसन तब्बल पाच वेळा जागतिक बुद्धिबळ विजेता बनलाय. तितक्याच खेपेला त्यानं जागतिक ‘रॅपिड’ किताब पटकावलाय (2014, 2015, 2019, 2022 नि 2023 साली). शिवाय तब्बल आठ वेळा तो ‘ब्ल्टि्झ’ प्रकारात जगज्जेता ठरलाय...
- मॅग्नसनं मे, 2014 मध्ये नोंद केली ती 2882 च्या रेटिंगची. बुद्धिबळाच्या इतिहासातील ते सर्वोच्च...
- 1 जुलै, 2011 पासून तो ‘फिडे रेटिंग’मध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे, या खेळाच्या इतिहासात इतका जास्त काळ अग्रस्थान कुणीच भूषविलेलं नाहीये...
- ‘क्लासिकल’ बुद्धिबळात ‘एलिट’ स्तरावर सर्वांत जास्त काळ अपराजित राहण्याचा प्रताप सुद्धा आहे तो त्याच्याच खात्यावर. चक्क 125 सामन्यांमध्ये त्यानं पराभवाचं तोंड पाहिलं नाही...
- राजू प्रभू