कार्लोस अल्कारेझचे दुसरे जेतेपद
वृत्तसंस्था / लंडन
एटीपी टूरवरील येथे झालेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझने झेकच्या लिहेकाचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. अल्कारेझचे क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेतील हे दुसरे जेतेपद आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अल्कारेझने लिहेकाचा 7-5, 6-7 (5-7), 6-2 असा पराभव केला. अलिकडच्या कालावधीत अल्कारेझने सलग 18 एकेरी सामने जिंकण्याची घोडदौड कायम राखली आहे. या अंतिम लढतीत अल्कारेझने केवळ 45 मिनिटांत पहिला सेट 7-5 असा जिंकला. पण त्यानंतर लिहेकाने दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबवत जिंकून अल्कारेझची बरोबरी साधली. त्यानंतर शेवटच्या सेटमध्ये अल्कारेझने आपल्या अनुभवाच्या जोरावर लिहेकाचे आव्हान 6-2 असे संपुष्टात आणले. गेल्या एप्रिल महिन्यापासून अल्कारेझने 28 पैकी 27 एकेरीचे सामने जिंकले आहेत. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता.