For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅरेबियन पॉवर जोमात, न्यूझीलंड कोमात

06:10 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅरेबियन पॉवर जोमात  न्यूझीलंड कोमात
Advertisement

विजयी हॅट्ट्रिकसह विंडीज संघ सुपर-8 मध्ये दाखल : सामनावीर रुदरफोर्डच्या नाबाद 68 धावा : न्यूझीलंडवर घरवापसीची टांगती तलवार

Advertisement

वृत्तसंस्था /त्रिनिदाद अँड टोबॅगो

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत यजमान वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर रोमांचक विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघ केवळ 136 धावाच करू शकला. वेस्ट इंडिजने यंदाच्या विश्वचषकात सलग तीन सामन्यात विजय मिळवून हॅट्ट्रिक केली आहे. यासोबतच कॅरेबियन संघ सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. दरम्यान, पराभवानंतर किवी संघ अडचणीत आला असून स्पर्धेत हा त्यांचा दुसरा पराभव आहे. अद्याप त्यांचे दोन सामने बाकी असून या सामन्यात त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे, याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

Advertisement

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यावरच उलटला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या. किवी गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आणि 30 धावांच्या स्कोअरवर 5 विकेट्स घेतल्या होत्या. सलामीवीर ब्रेंडॉन किंग (9), जॉन्सन चार्ल्स (0), निकोलस पूरन (17), रोस्टन चेस (0), कर्णधार रेव्हमन पॉवेल (1) हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यानंतर एकट्या शेरफेन रुदरफोर्डने शानदार खेळी करत विंडीजला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. रुदरफोर्डने अवघ्या 39 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारासह नाबाद 68 धावांचे योगदान दिले. त्याला अकील हुसेन (15), आंद्रे रसेल (14) व रोमॅरियो शेफर्ड (13) धावा करत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टीम साऊदी व लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

अलारी जोसेफचे चार बळी, किवीज संघ पराभूत

विजयासाठीच्या 150 धावांचा पाठलाग करताना किवी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डेव्हॉन कॉनवे आणि फिन अॅलन सलामीला आले, पण त्यांना दमदार सुरुवात देण्यात अपयश आले. तिसऱ्या षटकात अकील हुसेनने कॉनवेला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. इनिंगच्या पहिल्या टप्प्यात फिन अॅलन किवी संघाकडून उत्कृष्ट फलंदाज ठरला. पण अल्झारी जोसेफने सहाव्या षटकात त्याला बाद केले. अॅलनने 26 धावा केल्या. कर्णधार केन विल्यम्सन, डावखुरा युवा फलंदाज रचिन रवींद्र व डॅरिल मिचेल या स्टार फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ग्लेन फिलिप्सच्या खेळीमुळे किवी संघ चांगल्या स्थितीत आला, पण त्याला 18 व्या षटकात अल्झारी जोसेफने बाद केले. त्याच षटकात टिम साऊदीने जोसेफविरुद्ध गोल्डन डकवर आपली विकेट गमावली. फिलिप्सने 33 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले.

19 व्या षटकात ट्रेंट बोल्टला बाद करत आंद्रे रसेलने डावातील नववी विकेट घेतली. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 33 धावांची गरज होती. मिचेल सँटनरने 20 व्या षटकाची सुरुवात सलग दोन षटकार ठोकून सामना बदलण्याचा प्रयत्न केला, पण किवीज संघाला 9 बाद 136 धावापर्यंतच मजल मारता आली. सँटनरने 12 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हा सामना वेस्ट इंडिजने 13 धावांनी जिंकत सुपर-8 मधील आपले स्थान निश्चित केले. विंडीजकडून अल्झारी जोसेफने शानदार गोलंदाजी करताना 19 धावांत 4 बळी घेतले. याशिवाय फिरकीपटू गुडाकेश मोतीने 3 विकेट्स घेतल्या. अकील हुसेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज 20 षटकांत 9 बाद 149 (निकोलस पूरन 17, शेरफेन रुदरफोर्ड नाबाद 68, अकील हुसेन 15, आंद्रे रसेल 14, ट्रेंट बोल्ट 3 तर साऊदी व फर्ग्युसन प्रत्येकी दोन बळी).  न्यूझीलंड 20 षटकांत 9 बाद 136 (फिन अॅलन 26, ग्लेन फिलिप्स 40, मिचेल सँटनर नाबाद 21, जोसेफ 4 बळी तर गुडाकेश मोती 3 बळी).

न्यूझीलंडवर घरवापसीची टांगती तलवार

यजमान विंडीजकडून पराभव स्वीकारावा लागल्याने किवी संघावर टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची वेळ येऊ शकते. किवीज संघाला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने ते सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत. अद्याप किवीज संघाचे दोन सामने पापुआ न्यु गिनी आणि युगांडा यांच्याविरूद्ध शिल्लक आहेत. सुपर 8 मध्ये पोहोचायचे असेल तर संघाला हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय, इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. अफगाणिस्तानने 14 जूनच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केला तर न्यूझीलंड संघ अधिकृतपणे वर्ल्डकपमधून बाहेर होईल.

Advertisement
Tags :

.