काळजीवाहू मुख्यमंत्री तापाने फणफणले
सातारा :
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. तरीही अद्याप महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, गृहमंत्रीपद कोणाकडे ? याच्या चर्चा सुरु आहेत. असे असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे येथे आलेले आहेत. तेथे त्यांची प्रकृती बिघडली असून ते तापाने फणफणले आहेत, अशी माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
निकाल लागल्यानंतर महायुतीचे सरकार लगेच स्थापन होईल, महायुतीतले नेतेमंडळी मंत्रीपदाची शपथ घेतील असे राज्यातल्या जनतेला वाटले होते. परंतु निकाल लागून आठवडा झाला तरीही अजून सरकार स्थापन झाले नाही. महायुतीत अजूनही जोर बैठका सुरु आहेत. भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांच्या नावाला पाठींबा दर्शवला आहे. दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिंदे, फडणवीस व अजितदादा या त्रयींची भेट झाल्यानंतर ते मुंबईला परतले. परंतु तरीही सत्तास्थापनेचा तिढा सुटला नाही. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी आले आहे. गावी आल्यापासून त्यांनी कोणाचीही भेट घेण्याचे टाळले आहे.
थंडीचा कडाका प्रचंड असताना अचानक मुंबईहून साताऱ्याला थंड हवेच्या ठिकाणी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आल्याने त्यांना अचानक शुक्रवारी सायंकाळी त्रास जाणवू लागला. त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टें यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी चार जणांचे पथक बोलवण्यात आले. डॉ. पार्टे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 ताप आहे, सर्दी आहे. थ्रोट इन्फेक्शन आहे. त्यामुळे त्यांना सलाईन लावलेली आहे. त्यांना एक दोन दिवसात बरे वाटेल, आता त्यांची तब्येत बरी आहे. आमच्याबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. ते उद्या मुंबईला जाणार आहेत, असे डॉ. पार्टे यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे दरे गावी आल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी प्रशासकीय, नेते मंडळी व कार्यकर्ते भेटायला आले होते, परंतु प्रकृत्ती चांगली नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कोणालाही भेट दिली नाही.